चिपळूणः भाजपाने आपली जी निवड केली आहे. आहे ती समन्वयासाठी समन्वयातून संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आपापसात भांडायचे नाही. रत्नागिरीत आपल्याला मोठी लढाई लढायची आहे. आगामी २०२९मधील निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री भाजपचा असावा असे वाटतं ना! इथला भाजपचा आमदार असावा असं वाटतं की नाहीः मग कामाला लागा, असे आवाहन करताना नवनिर्वाचित विधान परिषदेचे भाजपा आमदार प्रमोद जठार यांनी कुंपणावर असलेलेही लवकरच भाजपमध्ये येतील, असा दावा केला.
महाराष्ट्र विधान परिषद आमदार म्हणून निवड झाल्यानंतर जठार यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शनिवारी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. त्यानिमित्त त्यांनी शनिवारी रात्री चिपळूण शहर आणि चिपळूण ग्रामीण मंडलातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन आभार मानले. तसेच सर्वांशी संवाद साधला. मार्कडी येथील भाजप संपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ते पुढे म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये आपण निवडणुका जिंकू असे कधी वाटले होते का? मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने निर्भेळ यश मिळवले, भाजपची केंद्रासह अनेक राज्यात सत्ता आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सत्ता का असावी? असे भाजपला वाटत होते, तर ममता बॅनर्जीनी बांगलादेशीयांसाठी आपल्या देशाची सीमा खुली ठेवली होती. यामुळे देशात बांग्लादेशींची घुसखोरी वाढत होती. आता घुसखोरी थांबणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा शत प्रतिशतः होण्यासाठी नवीन लोकांना भाजप पक्षात सामील करून घ्या. नवीन लोकांचा सन्मान झाला पाहिजे. हेतूपासून ढळू नका, पदात अडकू नका, पक्षासाठी वेळ द्या, सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा. भाजपा राष्ट्रीय पार्टी आहे. राष्ट्र रक्षणाची पार्टी आहे. तेव्हा राष्ट्र प्रवाहात सामील व्हा, असे आवाहन आमदार जठार यांनी यावेळी केले.
चिपळूणमध्ये मार्कडी कार्यालयाजवळ आमदार जठार यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोलपथकाच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधीरकाका भागवत यांची आमदार जठार यांनी भेट घेतली. यावेळी चिपळूण शहर आणि चिपळूण ग्रामीण मंडलाच्या वतीने मंडल अध्यक्ष विनोद भुरण आणि शशिकांत मोदी यांनी दोन्ही मंडलांच्या वतीने आमदार जठार यांचा सत्कार केला.
यावेळी रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, चिपळूणच्या उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, जिल्हा चिटणीस अॅड, नयना पवार, नगरसेविका रसिका देवळेकर, नगरसेविका अंजली कदम, नगरसेविका शितल रानडे, नगरसेवक शुभम पिसे, नगरसेवक संदीप भिसे, पं. स. सदस्य सायली वाजे, चिपळूण ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष आदिती गुडेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत शाह यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.