Konkan Railway pudhari photo
रत्नागिरी

Modi Express : मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री नितेश राणे यांची गणेशभक्तांसाठी ‘मोदी एक्स्प्रेस’ सज्ज!

९ व ११ सप्टेंबरला दादरहून कोकणकडे धावणार; २ ते ५ सप्टेंबरला होणार तिकीट बुकिंग

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मंत्री नितेश राणे यांची ९ आणि ११ सप्टेंबर रोजी ‘मोदी एक्‍स्‍प्रेस’ धावणार आहे. गेल्या १४ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांना गावाकडे घेऊन जाणाऱ्या या विशेष रेल्वेची या वर्षीची तयारी पूर्ण झाली आहे. ९ आणि ११ सप्टेंबर रोजी दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून सकाळी १०.३० वाजता ‘मोदी एक्‍स्‍प्रेस’ कोकणाच्या दिशेने रवाना होणार असल्याची घोषणा मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली.

मुंबईहून सुटणारी ही गाडी रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सावंतवाडी येथे थांबणार आहे. गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासात खाण्यापिण्याची व्यवस्था तसेच पिण्याचे पाणी यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

तिकीट बुकिंगसाठी २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत संबंधित भाजप मंडल अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री राणे यांनी केले आहे. कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातील चाकरमान्यांनी भाजप मंडलाध्यक्षांशी, तर रत्नागिरीतील प्रवाशांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.

गेल्या १४ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘मोदी एक्‍स्‍प्रेस’च्या माध्यमातून चाकरमान्यांना गावाकडे विनासायास नेत आहोत. दरवर्षी प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहून मनापासून समाधान वाटते. यंदाही नाचत-गाजत आपल्या गावाकडे जाण्यासाठी ‘मोदी एक्‍स्‍प्रेस’ सज्ज आहे, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. आपली हक्काची मोदी एक्सप्रेस पकडा आणि गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी गावाकडे जावूया, असे आवाहनही मंत्री नितेश राणे यांनी सर्व चाकरमान्‍यांना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT