रत्नागिरी : नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 2 डिसेंबर रोजी होत असून, सोमवार 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता प्रचाराची सांगता होत आहे. जिल्ह्यात निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठीही प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी, चिपळूण, राजापूर व खेड या नगरपरिषदा तर गुहागर, देवरुख, लांजा या तीन नगरपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात सध्या महायुती, महाविकास आघाडीसह काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष असे अनेक उमेदवार रिंगणात आहेत.
जिल्ह्यात प्रचाराची धूम सुरू असून अनेक नेतेमंडळींचे दौरे, सभा, कॉर्नर सभा होत आहेत. जिल्ह्यात महायुती की महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार याकडे नागरिकांचेही लक्ष लागून राहिले आहे. प्रचारासाठी राज्य निवडणूक आयोगाने एक दिवसाची मुदत वाढवून दिल्यामुळे प्रचाराला अधिक गती उमेदवार व मंडळींनी दिली आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेसाठीही प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान केंद्रावरती पोलिस बंदोबस्तासह प्रात्यक्षिकही घेण्यात आली. मतदान यंत्राची कर्मचार्यांसमोर प्रात्यक्षिकही करण्यात आले.
रत्नागिरीत 16 प्रभागांमध्ये 69 मतदान केंद्र असून 64 हजार 746 मतदार आहेत. रत्नागिरीत थेट नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवार रिंगणात आहेत. रत्नागिरीत सर्वात कमी मतदार केंद्र प्रभाग 3मध्ये तर उर्वरीत प्रभागात चार ते पाच मतदार केंद्र आहेत. मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार असून यासाठी 16 टेबल लावण्यात आली आहेत. प्रत्येक प्रभागासाठी एक टेबल लावण्यात आले आहे. त्यामुळे तास-दीड तासातच निकाल स्पष्ट होणार आहे.