Chiplun Teacher Death Case Travel Agent Arrested
चिपळूण : दोन दिवसांपूर्वी चिपळूण शहरालगत धामणवणे येथे एका वृद्ध शिक्षक महिलेच्या खुनाच्या घटनेनंतर अवघा जिल्हा हादरला. वर्षा जोशी (वय 68) असे या महिलेचे नाव आहे. या खूनप्रकरणी पोलिसांनी 48 तासांत कसून तपास करीत तालुक्यातील गोंधळे येथील जयेश भालचंद्र गोंधळेकर या तरुणाला गजाआड केले आहे. हा खून पैशाच्या लालसेतून झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. पोलिसांनी पकडलेला आरोपी हाच टॅ्रव्हल एजंट आहे.
यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे अपर पोलिस अधीक्षक बाबूराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि वृद्धेचा खून प्रकरणाचा उलगडा केला.
ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी रात्री हा प्रकार घडला. वर्षा जोशी यांचा खून करताना त्यांचे हात पाय बांधून नंतर त्यांचेच कपडे त्यांच्या तोंडात कोंबून व नाकावर ठेवून त्यांना ठार मारण्यात आले. चोरीच्या उद्देशाने हा खून केला. खुनानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त टाकले. घरातील 27 हजार रुपयांची रोख रक्कम, दोन बांगड्या, चैन सोन्याचा गोठ हे दागिने लांबविले.
जयेश गोंधळेकर हा काही वर्षांपूर्वी सातारा येथे नोकरी करत होता. तो मूळ वर्षा जोशी यांच्या गोंधळे गावातीलच गोंधळेकर कुटुंबातील आहे. संशयित तरुण जयेश सध्या चिपळूण परिसरात राहत होता. मात्र कोणताही नोकरीधंदा तो करत नव्हता. त्यामुळे पैशांसाठीच त्याने हा खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
ही घटना घडल्याचं समजताच तत्काळ घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हा पोलीस अधीक्ष बाबुराव महामुनी, पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने, पोलीस निरीक्षक श्री.मेंगडे चिपळूण येथील महिला पोलीस प्रांजल जोशी आदींच्या पथकाने धाव घेऊन या प्रकरणाचा युद्धपातळीवर तपास केला.
पोलिसांनी घराच्या आजुबाजूला असलेला जंगल परिसर शोधून काढला. काहींची चौकशी सुरू करण्यात आली. मात्र, दार फोडून नाहीतर दार उघडल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसले. त्यामुळे हा सगळा खुनाचा प्रकार कोणीतरी त्यांच्या ओळखीत व माहितीत असणार्या व्यक्तीचा सहभाग या सगळ्या गुन्ह्यामध्ये असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांना आला. त्या दृष्टीने चौकशी सुरू करण्यात आली. त्यामुळे हा खून चोरीच्या उद्देशानेच झाला ,असे पोलिसांनी सांगितले.
पोलीस कर्मचार्यांना रोख बक्षीस जाहीर
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी कुणाचा तपास अवघ्या 48 तासात लावल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, चिपळूण पोलीस ठाणे, डीपी स्कोर, व या तपास कार्यात सहभागी असणार्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांसाठी एकत्रित 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांना व्यक्तिगत दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आणि या प्रकरणी सर्व पोलीस कर्मचार्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले.
असा झाला खून
मारेकरी जयेश गोंधळेकर यांनी आपल्या साथीदाराला बरोबर घेऊन आधीच ओळख असल्याने पुढचा दरवाजा वाजवून घरात प्रवेश केला. वृद्धेने त्याच विश्वासाने त्यांना घरात घेतले. या नंतर वृद्धेचे हात-पाय बांधून तिचेच कपडे तिच्या नाकात तोंडात कोंबून तिला घुसमटून मारण्यात आले आणि रोख रक्कम व दागिने चोरण्यात आले, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.
सीसीटीव्ही पळवले....
दरम्यान,पोलीसांच्या हाती काही धागेदोरे लागू नयेत, म्हणून या मारेकरांनी सीसीटीव्ही पळवले, डीव्हीआर व कॉम्प्युटरची हार्ड डिस्क देखील लांबवली. पोलिसांनी डीव्हीआर आणि हार्ड डिस्क हस्तगत केली आहे. तर दागिन्यांचा तपास सुरू आहे. या खून प्रकरणात अजून एक आरोपी असल्याचा पोलिसांचा संशय असून त्याच्या मागावर पथक पाठवण्यात आले आहे.
असा झाला खुनाचा प्रकार उघड
वर्षा जोशी या पतीच्या निधनानंतर गेली 15 वर्षे घरात एकट्याच राहत होत्या. त्यांना निवृत्तीवेतन ही चांगले होते. त्यातून त्यांना पर्यटनाचा छंद जडला. त्यामुळे फिरण्यासाठी त्या सिंगापूर, नेपाळ याशिवाय भारतात अनेक ठिकाणी जात असत. खुनापूर्वीही त्या पिठापूर येथे जाणार होत्या. मात्र, त्या आधीच ओळखीतल्याच ट्रॅव्हल एजंट असलेल्या जयेश गोंधळेकर याने पैशाच्या लालसेतून त्यांना ठार मारले.
मारेकरी हा जय हॉलिडे नावाने ट्रॅव्हल्स बुकिंग करत असे. खासगी स्वरूपात त्याचे हे काम सुरू असे. वर्षा जोशी या अनेक वेळा त्याच्या माध्यमातून पर्यटनासाठी जात होत्या. वर्षा जोशी या आपल्या मैत्रिणीसोबत हैदराबाद दौर्यावर जाणार होत्या. त्यासाठी त्यांची मैत्रीण त्यांना मोबाईलला फोन करत होती. मात्र हा मोबाईल उचलला जात नव्हता. अखेर त्यांनी शेजारी असलेल्या एकाला फोन करून जोशी फोन उचलत नाहीत. त्यामुळे तेथे जाऊन बघण्यास सांगितले. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली त्यातून ट्रॅव्हल्स एजंटनेच हा खून केल्याचे समोर आले आहे.