चिपळूण : चिपळूण तालुक्यातील निवळी येथे पती-पत्नी यांनी एकाच दिवशी प्राण सोडला. या दोघांनी आपले अंतिम विधी चिपळुणातील रामतीर्थ स्मशानभूमीत करावेत, असे आधीच लिहून ठेवले होते. त्यानुसार त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनोहर श्रीपतराव सुर्वे (वय 91) व संगीता मनोहर सुर्वे (वय 81) असे या दोघांचे नाव आहे. मनोहर यांनी 1992 मध्ये रिझर्व्ह बँकेतून सेवानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर ते आपल्या निवळी गावी आले. पती-पत्नीने निवळीमध्ये शेती व सामाजिक काम सुरू केले. मुलगा विनायक मुंबईमध्ये खासगी नोकरीत, तर दोन्ही मुली मिनाक्षी व नलिनी यांचे लग्न व्हायचे होते. काही दिवसांपासून हे दोघे उभयता आजारी होते. मुलगा महिन्यातून एक-दोनदा गावी येत असे. रविवारी विनायक यांची तब्येत खालावली व त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर पत्नी संगीता यांनाही सावर्डे येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पत्नीची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना मुंबई येथे अधिक उपचारासाठी घेऊन जायचे ठरले. नातेवाईकांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली होती आणि विनायक सावर्डे येथे येण्याची प्रतीक्षा सुरू होती; मात्र सकाळी 9.15 वा. मनोहर यांचे निधन झाले. आपल्या पतीच्या निधनाचे वृत्त समजताच पत्नी संगिता यांना दुःख सहन न झाल्याने त्यांनीही दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास प्राण सोडला. या निधनाने सुर्वे कुटुंबीयांवर शोककळा पसरली. यानंतर सुर्वे दाम्पत्याने आपले अंत्यसंस्कार रामतीर्थ स्मशानभूमीत व्हावेत, असे आधीच लिहून ठेवल्याची माहिती सुर्वे यांच्या मुलाने कुटुंबीयांना दिली व त्यानुसार पती-पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.