चिपळूण :शिवेसना पक्ष हा कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान हेच आपले काम आहे. इथे कुणी मालक नाही की नोकर नाही. आपण सर्व कार्यकर्तेच आहोत. आज महायुतीच्या माध्यमातून आपण जि.प., पं. स.च्या निवडणुका लढवित आहोत. युतीची ताकद घेऊन लढतोय. आपणही मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ताच आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी त्यांना बळ देण्यासाठी मी इथे आलो आहे. आपल्यावर 50 आमदारांनी विश्वास टाकला म्हणूनच विकासाचे सरकार सत्तेवर आले. मी शब्द पाळणारा आहे. त्यामुळे विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आणि येथील जि.प., पं. स.वर युतीचाच भगवा झेंडा फडकेल, असा विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळुणातील प्रचार सभेत व्यक्त केला.
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रात भाजप-सेना युतीची प्रचार सभा झाली. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, सौ. स्वप्ना यादव, सीमा चव्हाण, गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल तसेच चिपळूण, गुहागर तालुक्यातील भाजप-सेना युतीचे जि. प., पं. स.चे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री असताना आपण अडीच वर्षांत जे काही काम केले ते आपल्याला आजही पाहायला मिळत आहे. आज राज्यभर फिरताना अनेक लोक दुतर्फा उभे असतात. महिला भगिनी स्वागत करतात. लाडक्या बहिणी आठवणीने भेटतात. हा मायेचा जिव्हाळा तयार झाला आहे. आपण अडीच वर्षांत केलेल्या कामामुळे महायुतीच्या 232 जागा निवडून आल्या. याआधी कधीही एवढे मोठे यश मिळाले नव्हते. 30 लाख कोटी उद्योगाचे दावोसमध्ये करार झाले. कोकणात देखील मोठे प्रकल्प आले पाहिजेत, पाणी योजना झाल्या पाहिजेत. पाऊस पडतो मात्र पाणी वाहून जाते. ते पाणी अडविले पाहिजे. त्यासाठी योजना आखतोय. कोकणात ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस हायवे होतोय. कोकण विकास प्राधीकरण देखील आपण करतोय. त्यामुळे कोकणच्या विकासाला चालना मिळेल. केंद्राने काजू, मत्स्य उद्योगासाठी चालना दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाला पुढे नेत आहेत तर राज्यात देवेंद्र फडणवीस आणि युती काम करीत आहे. त्यामुळे जि. प., पं.स.मध्ये देखील आपलीच सत्ता असायला हवी. यासाठी सर्वांनी एकत्रित काम करा आणि धुनष्यबाळ व कमळ चिन्हाला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.
विकासाला कधीही निधी कमी पडू देणार नाही. यासाठी आज आपण इथे आलो आहोत. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कधीही हात आखडता घेणार नाही, हा आपला शब्द आहे. कार्यकर्त्याची निवडणूक आहे म्हणूनच आपण इथे आलो. कार्यकर्ता हा पक्षाचा बॅकबोन असतो. हाच कार्यकर्ता पक्षाच्या नेत्याला मोठा करीत असतो. त्याच्या जिवावरच आपण राज्याचा डोलारा सांभाळत असतो. त्यामुळे आज या कार्यकर्त्याच्या निवडणुका असल्याने गावखेड्यातील हा कार्यकर्ता आहे. ग्रामीण भागाला विकासाकडे न्यायचे असेल तर आपल्या पक्षाचा कार्यकर्ता निवडून यायला हवा. त्यामुळे सर्वांनी दिलेल्या विश्वासामुळे जिल्ह्यात भगवा फडकल्याशिवाय राहाणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी चिपळूण व महाड येथे महापुरावेळी केलेल्या कामाची आठवण करून दिली.
राजकीय वैरी कोण हे ठरवावे लागेल ः उदय सामंत
दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघामध्ये जि. प., पं. स. निवडणुकीत युती करू शकलो नाही. त्याबाबत फार काही बोलणार नाही. त्याची कारणे काही असतील. पण, ज्यावेळी आपण एकसंघपणाने लढतो त्यावेळी विजयी होतो हे चिपळूण नगर परिषद निवडणुकीने दाखवून दिले. येथे प्रचारासाठी गृह राज्यमंत्री योगेश कदम आले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आपणदेखील होतो. त्यामुळे चिपळूणसारखा इतिहास घडवायाचा असेल तर आपला राजकीय वैरी कोण असेल हे आपण सर्वांनी ठरवायला हवे. आम्ही सांगतो म्हणून उबाठा राजकीय वैरी मानण्यापेक्षा आपण सर्वांनी राजकीय वैरी ठरविला पाहिजे. आपण जि. प.च्या नवीन इमारतीसाठी निधी दिला. चिपळूण न.प.साठी निधी आणला. चिपळूणसाठी 140 कोटीची नळपाणी योजना, नारायण तलाव, सांस्कृतीक केंद्रासाठी निधी साहेब तुम्ही दिलात. निधी कमी पडणार नाही याची खात्री बाळगा आणि शिंदे साहेबांच्या वाढदिनी जि. प. आणि सर्व नऊ पं. समित्या निवडून आणूया, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण म्हणाले, ज्या-ज्या वेळी साहेब येतात त्यावेळी वातावरण पालटून जातो. याचा अनुभव चिपळूण न.प.त आला. आता ते कार्यकर्त्यांसाठी आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करूया. याआधी न.प.वर शिवसेनेचा भगवा नव्हता. आता न.प.वर भगवा फडकला आहे. त्याच पद्धतीने पंचायत समितीवर देखील आपण सर्वांनी भगवा फडकवूया, असे आवाहनही सदानंद चव्हाण यांनी केले.