रत्नागिरी : स्वतःच्या पदापेक्षा महाराष्ट्राची जनता महत्त्वाची हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले आहे. सत्तेपेक्षा विचार महत्त्वाचा ही बाळासाहेबांची शिकवण जगणारा खराखुरा शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. नाथांचा नाथ एकनाथ शिंदे हे अभिमान वाटावे असे नेतृत्व असल्याच्या भावना माजी उद्योगमंत्री व शिवसेना नेते उदय सामंत यांनी व्यक्त केल्या.
याचवेळी त्यांनी सीएम झाल्यानंतरही स्वतःला कॉमन मॅन समजत आला, तो माणूस खर्या अर्थाने महाराष्ट्राचा सुपरमॅन आहे, असेही ते म्हणाले. समाजमाध्यमांवर सामंत यांनी आपल्या भाव व्यक्त करताना, मी तुमच्या सोबत, तुमच्या नेतृत्वाखाली काम करतो, याचा मला अभिमान आणि गर्व आहे.एकनाथ शिंदे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है ! असे सांगत, शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.
हिंदुत्व आणि महाराष्ट्रधर्मासाठी एकनाथ शिंदे यांनी सदैव आपले आयुष्य पणाला लावले. कधी स्वतचा स्वार्थ पाहिला नाही. रायगडातील ईर्शाळवाडी दुर्घटनेच्या वेळी जीवावर खेळून एकनाथ शिंदे तिथे पोहोचले. लोकं संकटात असताना तळमळणारा भावनिक नेता मी जवळून पाहिला आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये स्वतः धावून जाणारा हा अनाथांचा नाथ देशाने पाहिला आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच सामान्य माणसासाठी ‘वर्षा’ बंगल्याची कवाडे खुली झाली. जो माणूस सतत सामान्य माणसांसाठी जगतो, जो सीएम झाल्यानंतरही स्वतःला कॉमन मॅन समजत आला, तो माणूस खर्या अर्थाने महाराष्ट्राचा सुपरमॅन आहे. माझा नेता किती मोठा आहे, हे काल पत्रकार परिषदेत संपूर्ण महाराष्ट्राने बघितल्याचे ते म्हणाले.