झारेवाडी मूर्तीशाळेत साकारतोय पर्यावरणपूरक बाप्पा 
रत्नागिरी

Ratnagiri News : झारेवाडी मूर्तीशाळेत साकारतोय पर्यावरणपूरक बाप्पा

चिरेखाणीतील लाल माती, कागदाचा लगदा, शाडू मातीपासून घडवल्या जातात आकर्षक गणेशमूर्ती

पुढारी वृत्तसेवा

कडवई : कोकणात पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा स्वीकार वाढत असताना संगमेश्वर तालुक्यातील झारेवाडी येथील कळंबटे कुटुंबाने मूर्तीकलेत आगळावेगळा प्रयोग साकारला आहे. चिरा खाणीतील लाल माती, कागदाचा लगदा आणि शाडूमाती यांचा समन्वय साधत त्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडवल्या आहेत. यासोबतच गणेशाचे वाहन असलेल्या मूषकाच्या स्वतंत्र मूर्ती तयार करून त्यांनी भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

कळंबटे कुटुंबाची गणेशमूर्ती निर्मितीची परंपरा तिसऱ्या पिढीत पोहोचली आहे. बाबाजी कळंबटे यांनी सुरू केलेला हा वारसा रमेश बाबाजी कळंबटे यांनी पुढे नेला, तर आता राहुल आणि रोहित कळंबटे हे दोघे बंधू ही परंपरा जपत नव्या प्रयोगांना चालना देत आहेत. त्यांच्या मूर्तीशाळेत प्लास्टर ऑफ पॅरिसला पूर्णपणे फाटा देत शाडूमाती आणि कोकणातील लाल चिरा खाणीतील मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या जातात.

देवरुख येथील डीकॅड विद्यालयात शिक्षण घेत असताना राहुल आणि रोहित यांनी कागदापासून मूर्तीकलेचे प्रशिक्षण घेतले. त्याचाच उपयोग त्यांनी व्यवसायात केला. सुमारे ३० टक्के शाडूमाती, ३५ टक्के चिरा खाणीतील लाल माती आणि ३५ टक्के कागदाचा लगदा यामध्ये गोंद मिसळून तयार केलेल्या मिश्रणातून या मूर्ती घडवल्या जातात. त्यामुळे मूर्ती मजबूत बनते आणि विसर्जनानंतर सहज विरघळून पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचत नाही. यंदा त्यांनी अशा सुमारे ५० पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या आहेत.

पूर्वी ते पूर्णपणे शाडूमातीच्या मूर्ती तयार करत होते. मात्र, शाडूमाती विरघळली तरी ती चिकट स्वरूपाची असल्याने जमिनीला किंवा वनस्पतींना फारसा उपयोग होत नाही. यंदा पेण येथून मागविल्या जाणाऱ्या शाडूमातीचे दर वाढल्याने तसेच इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने शाडूमातीच्या मूर्तींच्या किमतीत सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे कळंबटे बंधूंनी सांगितले.

कळंबटे बंधूंनी गणेशमूर्तीं सोबतच गणेशाचे वाहन असलेल्या मूषकाच्या स्वतंत्र मूर्ती तयार करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वसाधारणपणे मूषक हा गणेशाच्या पाटावरच साकारला जातो. मात्र कळंबटे बंधूंनी हातात मोदक घेतलेल्या स्वतंत्र बैठकीवरील मूषक मूर्ती तयार करून त्याला स्वतंत्र स्थान दिले आहे. गेली दोन वर्षे सुरू असलेल्या या प्रयोगाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT