Water Scarcity 
रत्नागिरी

Ratnagiri News| पाणीटंचाईत कामे टाळणार्‍या ठेकेदारांना पाठीशी घालू नका

सभापती पांचाळ : रत्नागिरी पंचायत समितीची मासिक सभा; ३७ हून अधिक गावांना पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्हाभरात पर्जन्यमानातील बदलांमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची समस्या अत्यंत गंभीर होत चालली आहे. या समस्येचे गांभीर्य ओळखून सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी पाणीटंचाई निवारणाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, अधिकार्‍यांनी कामे टाळणार्‍या ठेकेदारांना पाठीशी घालू नये, असे निर्देश रत्नागिरी पंचायत समितीचे सभापती प्रवीण पांचाळ यांनी दिले.

या सभेत पाणीटंचाईच्या नियोजनासोबतच बससेवा, स्मार्ट कार्ड व दिवाळीतील जादा गाड्यांबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. सभेत पाणीटंचाईचा आढावा घेताना भूजल सर्वेक्षण अधिकाऱ्यांच्या अहवालाचा संदर्भ देण्यात आला. गेल्या ५ वर्षांतील विहिरींच्या पाण्याची पातळी, स्थानिक निरीक्षणांवरून टंचाईग्रस्त गावांची वर्गवारी ३ टप्प्यांत करण्यात आली आहे. पहिला टप्पा ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या कालावधीत सुमारे १२ गावांमध्ये टंचाई भासण्याची शक्यता आहे. दुसरा टप्पा जानेवारी ते मार्च २०२७ या कालावधीत १३ गावांना झळ बसू शकते. तिसरा टप्पा एप्रिल ते जून २०२७ या कालावधीत १२ गावांमध्ये टंचाईची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकूण ३७ गावांमध्ये टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची प्राथमिक शक्यता असून हा टंचाईग्रस्त गावांचा आकडा भविष्यात ४० च्या पार जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केवळ टँकरवर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर विहिरी व कूपनलिकांचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्याचे ठरले. ज्या गावांत टँकरऐवजी पर्यायी विहिरी किंवा कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य आहे, तेथे अधिग्रहण व इतर तांत्रिक व्यवस्था तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच टँकर भरण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध राहील, याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती व पालकमंत्री यांच्‍यासोबत चर्चा करून उपाययोजना वेगाने अंमलात आणल्या जातील, असेही सांगण्यात आले.

अर्धवट राहिलेल्‍या योजना तातडीने पूर्ण करुन घेण्‍याबाबत अधिकार्‍यांना निर्देश देण्‍यात आले. ठेकेदार टाळाटाळ करीत असतील तर त्‍यांना पाठीशी घालू नये असा स्‍पष्‍ट इशारा पांचाळ यांनी दिला. टँकर मंजुरीच्या प्रक्रियेत होणारा विलंब टाळण्यासाठी, संबंधित ठिकाणी अभियंत्यांनी तातडीने प्रत्यक्ष 'स्पॉट पाहणी' करून अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. टंचाईग्रस्त गावांची संख्या १० वरून थेट ४० पर्यंत जाण्याची शक्यता असल्याने, शासनाकडून प्राप्त होणारा निधी आणि टँकरची वाढती मागणी वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी पूर्ण ठेवावी, असे आवाहन करण्यात आले.

एसटी कर्मचार्‍यांबाबत अनेक तक्रारी आल्‍या असून अशा कर्मचार्‍यांना पाठीशी न घालता संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सदस्‍यांनी केली. आगामी ५ तारखेपासून दिवाळी सणासाठी पंढरपूर आणि पुणे मार्गावर विशेष जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. स्मार्ट कार्डबाबत निर्माण झालेला घोळ आता दूर झाला आहे. नवीन कार्डधारकांना पावती दिली जात असून, त्यावरील क्यूआर/स्कॅनरद्वारे सवलत उपलब्ध करून दिली जात आहे. ज्या ठिकाणी स्कॅनिंगमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत, तेथील मशीन एकत्रित करून कॅमेरा व इतर खराब भागांची दुरुस्ती किंवा रिप्लेसमेंट करण्याचे काम सुरू असल्‍याची माहिती एसटी अधिकार्‍यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT