Konkan Railway 
रत्नागिरी

Konkan Railway : दिवाळीत कोकणासाठी रेल्वेची ‘स्पेशल’ भेट!

तिरुअनंतपुरम-मदार साप्ताहिक विशेष गाडी; रत्नागिरी, चिपळूण, खेडला थांबे

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : दसरा-दिवाळीच्या सणासुदीत कोकण रेल्वे मार्गावर होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन तिरुअनंतपुरम सेंट्रल ते मदार जंक्शनदरम्यान विशेष साप्ताहिक गाडी चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २१ ऑक्टोबरपासून ही विशेष सेवा सुरू होणार असून २५ नोव्हेंबरपर्यंत तिच्या फेऱ्या प्रस्तावित आहेत. त्यामुळे केरळसह दक्षिण भारतातून कोकणात येणाऱ्या तसेच कोकणातून पुढे राजस्थानच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

तिरुअनंतपुरम सेंट्रल येथून सुटणारी विशेष गाडी क्रमांक ०६०१३ दर बुधवारी सकाळी ७.४५ वाजता रवाना होणार असून तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता मदार जंक्शनला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०६०१४ मदार जंक्शन येथून शनिवारी रात्री रवाना होऊन तिरुअनंतपुरम सेंट्रलला पोहोचणार आहे. उपलब्ध वेळापत्रकानुसार या विशेष गाडीच्या सहा फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या गाडीचा कोकणातील प्रवाशांना विशेष फायदा होणार आहे. गाडीला मडगाव, थिविम, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यानंतर ती माणगाव, रोहा, पनवेलमार्गे पुढे धावणार आहे. दक्षिणेकडील कोकण पट्ट्यातील प्रवाशांनाही या गाडीचा लाभ मिळणार आहे.

दसरा आणि दिवाळीच्या सुट्यांमध्ये मुंबई, पुणे तसेच केरळ आणि दक्षिण भारतातील विविध भागांतून कोकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. नियमित गाड्यांचे आरक्षण लवकर फुलल्याने प्रतीक्षा यादीही वाढते. अशा परिस्थितीत विशेष गाड्यांमुळे नियमित रेल्वेसेवेवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, कोकण रेल्वेने यापूर्वीही सणासुदीच्या काळात तिरुअनंतपुरम सेंट्रल–मदार जंक्शन मार्गावर विशेष गाड्या चालविल्या आहेत. मार्चमध्ये होळीच्या गर्दीसाठीही ०६०१३/०६०१४ ही साप्ताहिक विशेष सेवा चालविण्यात आली होती. या गाडीला रत्नागिरी, चिपळूण, खेडसह कोकणातील अनेक स्थानकांवर थांबे देण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT