रत्नागिरी : परप्रांतीय अत्याधुनिक मच्छीमार नौकांची घुसखोरी, धोक्याच्या इशार्यामुळे मासेमारी वरचेवर बंद राहू लागली आहे. मासेमारीसाठी समुद्रात जाणार्या स्थानिक नौकांना मासळी मिळेनासी झाली आहे. त्यामुळे फिशींग, रापण मासेमारीपाठोपाठ मासेमारी उद्योगसुद्धा अखेरच्या घटका मोजू लागला आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून या मासेमारीवर उभा असलेला छोटा-मोठा व्यवसाय अडचणीत आला आहे. याचवेळी खवय्यांना सुद्धा मासळी चढ्या दराने खरेदी करावी लागत आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी. चा सागरी किनारा लाभला असून जिल्ह्यात 3 हजार 387 मच्छीमार नौका आहेत. यामध्ये सुमारे 390 पर्ससीन आणि मिनी पर्ससीननौका आहेत. दरवर्षी 1 सप्टेंबर रोजी मासेमारीसाठी पर्ससीननौका समुद्रात जातात. यावर्षी पावसाळा लांबल्याने नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने मासेमारी सुरु झाली. त्यानंतर चक्रीवादळांचा धोका, मतलई वारे आणि समुद्रात उसळणार्या मोठ मोठ्या लाटांमुळे नौका मालकांनी स्वतःहून मासेमारी बंद ठेवली. त्यामुळे गेल्या साडेतीन महिन्यात दीड दोन महिनेच मासेमारी करता आली.
गोवा, मलपी, गुजरात, कर्नाटकच्या अनेक अत्याधुनिक नौका जिल्ह्याच्या समुद्रात मासेमारीसाठी घुसखोरी करत आहेत. परप्रांतीय एका नौकेचे क्षमता स्थानिक 10 नौकांच्या बरोबरीची असते. शेकडो परप्रांतीय नौका समुद्रातील लहान - मोठा मासा खरडवून नेत आहेत. खोल समुद्रात या परप्रांतीय नौका एलईडी मासेमारीसुद्धा करतात. मतलई वार्यांमुळे सध्या पर्ससीन नौकांना मासळी मिळत नाही. या नौका समुद्रातून बंदरात परत येतात.
परिणामी 500 रु. किलो दराने मिळणारी सुरमई 1000 ते 1200 रु. किलो दराने मिळू लागली आहे. ज्या बांगड्याचा एका टपाचा दर अडीच हजार रुपये होता तो 5 हजार रु. पर्यंत पोहचला आहे. पापलेटचे दर्शन दुर्मिळच झाले आहे. 400 रु. किलो दराने मिळणारा सरंगा 600 ते 700 रु. पर्यंत पोहचला आहे. 300 रु. दराच्या कोळंबीचा किलोचा भाव 500 ते 600 रु झाला आहे.
मासळी मिळत नसल्याने पारंपरिक फिशिंग आणि रापण नौका बंद होण्याच्या मार्गावर आहेत. नौकेला मालकांना मासेमारीसाठी 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो. यामध्ये खलाशी, तांडेल, पागी यांचे जिन्नस, इंधन, पाणी, बर्फ आदी खर्चाचा समावेश आहे. परप्रांतीय नौका एकदा समुद्रात मासेमारीसाठी आल्या की महिनाभर मासेमारी करुन बंदरात जातात. त्यामुळे परप्रांतीय अद्यावत एक नौका स्थानिकांच्या 10 नौकांचा मासा किंवा मासळी उद्योग हिरावून नेत आहेत.
अनेक पूरक उद्योग धोक्यात...
जिल्ह्यातील मासेमारीवर बर्फ, टेम्पो, बंदरावरील विविध दुकाने असे अनेक पुरक उद्योग अवलंबून आहेत. मासेमारीच अडचणीत आली असल्याने पुरक उद्योगही धोक्यात आले आहेत. या सर्व घडामोडींचा परिणाम स्थानिक पातळीवर मिळणार्या मासळीच्या दरावरसुद्धा होत आहे. त्यामुळे समुद्र असतानाही येथील खवय्यांना चढ्यादराने मासळी विकत घेण्याची वेळ आली असल्याचे अनेक नौका मालकांनी सांगितले.