जाकीरहुसेन पिरजादे
रत्नागिरी : हॅलो... मी ईडी, मुंबई पोलिस, सायबर पोलिस, सीबीआयमधून बोलतोय... तुमच्या मोबाईलवरून, बँकेच्या अकाउंटवरून मनी लॉर्डिंग झाले आहे. तुमच्याविरोधात तक्रार आहे. तुम्हाला अटक करावी लागेल, असे म्हणून व्हिडीओ कॉल करून डिजिटल अरेस्टची धमकी देवून सायबरचे भामटे लाखो रुपयांची फसवणूक करीत आहेत. तसेच सोशल मीडियावरील तरूणाई, प्रतिष्ठीत व्यक्तींना अश्लील व्हिडीओ कॉल करून, अश्लील इशारे करतात. सर्व व्हिडीओ रेकॉर्ड करून पैशांची मागणी होते. पॉर्न क्लिप, फोटोस पाठवल्या आहेत. त्यामुळे अनोळखी कॉल, डिजिटल अरेस्टवर विश्वास न ठेवता खात्री करा, सतर्क राहावे, अन्यथा आयुष्यभराची कमाई सायबरचे भामटे लुटायला बसले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सोशल मीडियावरून फसवणुकीचे प्रकार वाढत असून नागरिकांनी सावधान व सतर्क राहिले पाहिजे.
अलीकडे सायबर भामट्यांकडून सोशल व्हिडीओ कॉल फिचर वापरण्यात येत आहे. अनोळखी व्यक्तीचा व्हिडीओ कॉल टाळलेलाच बरा, अन्यथा ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होत आहे. स्मार्ट फोनमुळे सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. अनेकजण सर्व व्यवहार ऑनलाईन करतात. याचाच फायदा आता सायबर भामटे घेत आहेत. आता फसवणुकीसाठी नवीन फंडा सुरू केला असून, व्हॉटस्अॅप या सोशल मीडियावरून व्हिडीओ कॉलिंग फिचरचा वापर अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. समोरील व्यक्ती थेट द़ृश्य स्वरूपात दिसत संवाद साधला जात असल्याचे फिचर लोकप्रिय झाले आहे. याचा फायदा गुन्हेगार घेत आहेत. सायबर भामटे नेमके आवाज करून अनोळखी नंबरवरून व्हिडीओ कॉल करतात. तसेच न्यूड व्हिडीओ दाखवतात. भावना विचलित करतात तसेच समोरील व्यक्ती महिला असेल, तर ती अश्लील भाषेत बोलून अश्लील चाळे करण्यास भाग पाडते. हे सारे रेकॉर्ड करून एक लिंक, व्हिडीओ व्हॉटस्अॅपला पाठवतात. तसेच मेसेज व चॅट करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैसे मागतात. यामुळे कित्येक जण उच्चप्रतिष्ठीत व्यक्तीसुद्धा बळी पडली आहेत, मात्र इमेजखातीर ते तक्रार करीत नाहीत.
दुसरीकडे व्हॉटस्अॅप, इन्स्टावर व्हिडीओ कॉलकरून मी ईडी, सायबर, कस्टम ऑफिसर बोलतोय, तुमच्या खात्यात दोन कोटींचा मनी लॉडिरिंग झाला आहे. हा पैसा दहशतवादी संघटनेकडून पाठवला आहे. तुमच्या विरोधात तक्रार असून तुम्हाला अरेस्ट करावी लागेल, असे म्हणून व्हिडीओ कॉल करून भीती दाखवतात.अटक व्हायची नसेल, तर ठराविक रक्कम मागतात. तुमच्याकडून ऑनलाईन पैसे पाठवण्यास सांगितले जाते. नागरिक घाबरून ऑनलाईन पैसे पाठवतात. सायबरचे भामटे फायदा घेऊन लाखों रूपये उकळतात. यामध्ये व्यापारी, मोठी व्यक्ती, मध्यम, उच्चवर्गीय व्यक्ती, महिला, ज्येष्ठ नागरिक टार्गेट करीत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यात ऑनलाईन फसवणूक मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. त्यामुळे सायबर विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. मात्र, तरीही नागरिक घाबरून जाऊन फसत असल्याचे चित्र आहे.
सायबर गुन्ह्यापासून सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षित पासवर्ड वापरावे अनोळखी नंबरवरील लिंक ओपन करून नये अनोळखी फोनवर ओटीपी कोणालाही देऊ नये
चुकून व्हिडीओ कॉलवरून संपर्क झालाच, तर संशयितांच्या धमक्यांना न घाबरता सायबर पोलिसला तक्रार करावी ब्लॅकमेलिंगसाठी संशयितांनी ज्या क्रमांकावरून कॉल केला तो ब्लॉक करा, कॉलसंदर्भात रिपोर्ट करा पासवर्ड, बँकेचा तपशील मागणार्या ई-मेल, संदेशावर विश्वास ठेवू नका सायबर गुन्ह्याबद्दल स्वत: आणि इतरांना जागरूक करा
चुकून जर तुम्ही फसला, तर 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क करा किंवा सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टल, सायबरच्या वेबसाईटवर तक्रार नोंदवा किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस तक्रार करा, अलर्ट राहा, सावधान राहा.