देवरुख उपजिल्हा रुग्णालय रूपांतर प्रक्रियेस वेग 
रत्नागिरी

Ratnagiri News : देवरुख उपजिल्हा रुग्णालय रूपांतर प्रक्रियेस वेग

नगराध्यक्षा मृणाल शेट्ये आणि सहकारी नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश

पुढारी वृत्तसेवा

देवरुख : देवरुख व संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. देवरूख येथील ५० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याच्या मागणीला महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. आरोग्य सेवा आयुक्तालयाने याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठवत शासनस्तरावर लवकर निर्णय घेण्याची शिफारस केली आहे.

देवरुखच्या नगराध्यक्षा मृणाल अभिजित शेट्ये यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत आरोग्य सेवा आयुक्तालयाने हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. १६ जुलै २०२६ रोजीच्या अधिकृत पत्रात नगराध्यक्षा यांनी केलेल्या मागणीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून शासनाने यावर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे. देवरुख ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यास आधुनिक आरोग्य सुविधा, अधिक वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, वाढीव उपचार क्षमता आणि नागरिकांना स्थानिक पातळीवर अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यासह परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांनी नागरिकांच्या आरोग्य सुविधांचा प्रश्न प्राधान्याने शासनाकडे सातत्याने मांडला. त्यांच्या या प्रयत्नांना आता सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आता शासनाच्या अंतिम मंजुरीकडे लक्ष लागले आहे. जनतेच्या आरोग्यासाठी केलेला पाठपुरावा फळाला येत असून देवरूखच्या विकासाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

आता शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, संगमेश्वर-चिपळूण विधानसभेचे आमदार शेखर निकम, विधान परिषद सदस्य आमदार प्रमोद जठार, भैय्या सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे शेट्ये यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT