चिपळूण : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ बुधवारी (दि. 28) चिपळूणमध्ये धडाडणार आहे. जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील बहादूरशेख चौकानजीकच्या स्वा. सावरकर मैदानात दुपारी 1.30 वा. रत्नागिरी जिल्ह्याची जाहीर प्रचार सभा होणार आहे. या प्रचारसभेची जोरदार तयारी करण्यात येत असून, प्रथमच मुख्यमंत्री फडणवीस चिपळूण दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
या सभेला भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, खा. नारायण राणे, मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे, राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत, भाजपा नेते प्रशांत यादव, माजी आ. डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. न.प. निवडणुकीमध्ये जिल्ह्यात महायुतीला मिळालेल्या यशाच्या पर्श्वभूमीवर या प्रचार सभेला विशेष महत्त्व आले आहे. भाजपने तर गुहागर, देवरूख नगरपंचयतीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. अन्य ठिकाणीही भाजपच्या जागा वाढल्या आहेत. चिपळूणमध्येही सात नगरसेवक निवडून आले असून उपनगराध्यक्षपद भाजपकडे आहे. या पार्श्वभूमीवर जि. प., पं. स. निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेना एकत्र निवडणुका लढवित आहेत. काही ठिकाणी महायुती झाली असून काही ठिक़ाणी मात्र महायुतीला यश मिळालेले नाही. मात्र, मुख्यमंत्री महायुतीच्या प्रचारासाठी जिल्ह्यात येत असून चिपळुणातील स्वा. सावरकर मैदानात ही भव्य प्रचारसभा होणार आहे. त्यासाठी मंडप उभारण्यात आल्या असून शहरात कमानी उभारण्यात येत आहेत. भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये या सभेच्या पार्श्वभूमीवर उत्साह संचारला असून संपूर्ण जिल्ह्यातून भाजपा व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सभेला उपस्थित राहाणार आहेत. या सभेत मुख्यमंत्री फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. या सभेला ग्रामीण भागासहीत शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा नेते प्रशांत यादव यांनी केले आहे.