चिपळूण : येथील नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर युतीने आपली ताकद दाखवण्यासाठी रविवारी मोठी जाहीर सभा आयोजित केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे स्वतः चिपळूणमध्ये उपस्थित राहून युतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत.
ना. शिंदे यांच्या सभेचे आयोजन चिपळूण शहरातील पवन तलाव शेजारील चौपाटीवर रविवारी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. सभेला शिवसेना (एकनाथ शिंदे), भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तिन्ही पक्षांच्या युतीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभणार असल्याचे सांगण्यात आले. चिपळूण नगर परिषद निवडणुकीत महायुतीतर्फे शिवसेनेचे शहराध्यक्ष उमेश सकपाळ हे नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहेत. या सभेला भाजपचे नेते प्रशांत यादव, शिवसेना आणि भाजपचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तसेच रिपाइंचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.