रत्नागिरी : विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हावासीयांचे आभार मानण्यासाठी शनिवारी (दि.15) रत्नागिरीत येत आहेत. या मेळाव्यात ना. उदय सामंत यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील माजी आमदार सुभाष बने, गणपतराव कदम यांच्यासह माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने व पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत.
या पक्षप्रवेशाने उबाठाला मोठा धक्का जिल्ह्यात बसणार आहे. यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची ताकद मात्र जिल्ह्यात वाढणार असून, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगर पालिकांमध्ये मोठा फायदा मिळणार आहे. दरम्यान, या दौर्याची जय्यत तयारी झाली आहे. रत्नागिरी शहरालगतच्या चंपक मैदानावर ही भव्य सभा व प्रवेश सोहळा पार पाडणार आहेत. दुपारी सव्वादोन वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री रत्नागिरीत दाखल होणार आहेत. त्यानंतर लगेचच सभेला सुरुवात होणार आहे.
महायुतीला राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचा दौरा करीत असून, शिवसेनेवर दाखवलेल्या प्रेमाबद्दल ते आभार व्यक्त करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पाचपैकी चार जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. त्यातही तीन जागांवर शिवसेनेचे उमेदवार आमदार म्हणून विजयी झाले. गुहागरच्या एका जागेवर थोडक्यात अपयश आले. मात्र याठिकाणीही महायुतीने मोठे काम करीत विरोधकांची धडधड वाढवली आहे.
विधानसभेला रत्नागिरी मतदार संघामधून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे पाचव्यांदा तर राजापूरमधून मोठे बंधू किरण उर्फ भैया सामंत हे प्रथमच मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. सामंत बंधूंमुळे जिल्हयात त्यांचे सामर्थ्य वाढले आहे. उत्तर रत्नागिरीत मंत्री योगेश कदम यांनी चांगले प्राबल्य निर्माण करुन, उबाठाला जोरदार धक्का दिला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदांमध्ये शिवसेना महायुतीचे वर्चस्व निर्माण करता यावे यासाठी सामंत बंधूंसह योगेश दादाही कामाला लागले आहेत. उबाठासह राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेसचे पदाधिकारी शिवसेनेत यावेत, म्हणून प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. शिवसेना उबाठाला याठिकाणी धक्क्यांवर धक्के मिळत आहे. नुकताच उपनेते राजन साळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
या मेळाव्याला येणार्या कार्यकर्त्यांसाठी जवळपास तीस हजारहून अधिक खुर्च्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक जि.प. गटातून एक हजार कार्यकर्ते येतील, अशी तयारी ना. उदय सामंत यांनी केली असून, सर्वच प्रमुख पदाधिकारी या तयारी व्यस्त झाले आहेत.