रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात पावसाने उघडी घेतल्यानंतर आता साथरोगांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यांच्या कालावधीत डेंग्यूचे एकूण ९२ रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक रत्नागिरी शहरात ५२ रुग्ण मिळाले आहेत. आरोग्य विभागाने या कालावधीत ५५६ संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासले आहेत. मलेरियाचे रुग्ण २०० पार झाले आहेत.
पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांत ८० रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक उद्रेक झाला. रत्नागिरी, संगमेश्वर या दोन तालुक्यात मिळून ६३ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात पावसाने मोठी हजेरी लावली.
त्यानंतर दडी मारली आणि सर्दी, ताप, खोकल्यासह मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण वाढायला सुरुव. त्यामुळे दररोज हजारो रुग्णांची तपासणी होत आहे. ९२ डेंग्यू रुग्णांपैकी ७ रुग्ण स्थानिक आहेत, तर इतर सर्व रुग्ण स्थलांतरित व मजूर असल्याचे सांगण्यात आले. गणेशोत्सवामुळे मुंबई, पुणे येथून आलेला नागरिक, स्थलांतरित मजूर यांच्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात रुग्ण संख्या वाढल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्येत घट दिसत असली तरी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेली वाढ चिंताजनक असून नागरिकांनी घराजवळ पाणी साजू देऊ नका, आजार अंगावर काढू नये, लक्षणे आढळ्यास त्वरित डॉक्टरांना दाखवावे, असे आवाहन करण्यात आले.
मंडणगड: १
दापोली: २
खेड: २
गुहागर: ९
चिपळूण: ३
संगमेश्वर: ११
रत्नागिरी: ५२
लाanja: ७
राजापूर: ५
एकूण: ९२
जानेवारी महिन्यात दोन रुग्ण आढळले. एप्रिल १, जून ५, जुलै ४, ऑगस्ट १८, सप्टेंबर ३९, ऑक्टोबर २३ अशा प्रकारे ९२ रुग्ण आढळले आहेत. फेब्रुवारी, मार्च, मे महिन्यात एकही रुग्ण आढळलेला नाही.