प्रवीण शिंदे
दापोली : दापोली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असून, उमेदवारीवरून राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाल्याचे चित्र दिसत आहे. इच्छुकांची संख्या मोठी असताना मोजक्यांनाच संधी मिळाल्याने अनेकांचा हिरमोड झाला असून, त्यातूनच अंतर्गत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. कोळबांद्रे गटात कुणबी समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. त्यामुळे मतदारसंघातील सामाजिक कौल लक्षात घेऊनच पक्षाने कुणबी समाजाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला असावा, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये रंगू लागली आहे.
जिल्हा परिषद कोळबांद्रे गटात शिवसेना शिंदे पक्षाकडून उमेदवारी मिळेल, या आशेवर अनेक इच्छुकांनी जोरदार प्रयत्न केले होते. आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोंढे गावातील माजी समाजकल्याण सभापती दिलीप कासारे आणि पन्हाळेकाझी येथील प्रदीप जाधव यांची नावे चर्चेत होती. मात्र प्रभाकर गोलांबडे यांनी सर्वप्रथम उमेदवारी अर्ज दाखल करत शिवसेना शिंदे पक्षाकडून आपली उमेदवारी निश्चित केली. गोलांबडे हे यापूर्वी दापोली पंचायत समितीचे सदस्य राहिले असून, जिल्हा नियोजन समितीवरही त्यांनी काम केले आहे. त्याच्याकडे प्रशासकीय कामाकाजाचा दांडगा अनुभव आहे.
कोंढे गावातील माजी समाजकल्याण सभापती दिलीप कासारे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत शिवसेना शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला होता. समाजकल्याण समितीतील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा होती तर शिवसेना पक्षफुटीनंतर सातत्याने शिंदे सेनेशी निष्ठा राखत पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले प्रदीप जाधव यांनीही उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र या दोन्ही महत्त्वाकांक्षी इच्छुकांना उमेदवारी मिळू शकली नाही.
दरम्यान, प्रभाकर गोलांबडे यांच्या उमेदवारीकडे केवळ अनुभवाच्या नव्हे, तर सामाजिक गणिताच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. गोलांबडे हे कुणबी समाजाचे या विभागातील नेते मानले जात असून, कोळबांद्रे गटात कुणबी समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. त्यामुळे मतदारसंघातील सामाजिक कौल लक्षात घेऊनच पक्षाने कुणबी समाजाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला असावा, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये रंगू लागली आहे. अनुभव, निष्ठा आणि सामाजिक समीकरण यांचा तोल साधत पक्षाने निर्णय घेतल्याचे संकेत मिळत असले, तरी उमेदवारीवरून निर्माण झालेली अंतर्गत नाराजी प्रचाराच्या काळात कितपत परिणाम करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. उमेदवारी जाहीर झाली असली तरी विजयासाठी सर्व घटकांना सोबत ठेवणे, हेच आता संबंधित पक्षासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.