प्रवीण शिंदे
दापोली : राज्यात गाजलेल्या अशोक खरात प्रकरणानंतर दापोली तालुक्यातीलही ‘भोंदूगिरी’च्या प्रकारांकडे नागरिकांचे लक्ष वेधले जाऊ लागले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या तथाकथित बाबांच्या कारवायांविरोधात नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
तालुक्यातील काही गावांमध्ये बाबांचा बुरखा घेऊन ‘दरबार’ मांडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याची चर्चा तालुक्यातील जनतेमधून होऊ लागली आहे. अंधश्रद्धा, भीती आणि चमत्कारांच्या आडून सामान्य लोकांवर प्रभाव टाकण्याचे प्रकार सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.
या माध्यमातून काही जण स्वतःभोवती अनुयायांचा गोतावळा तयार करून आपले जाळे अधिक मजबूत करत असल्याचे चित्र दिसत आहे.यातच काही ठिकाणी या बाबांच्या भोवती ‘अंबट’ मंडळी एकत्र येऊन भोंदूगिरीला खतपाणी घालत असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. अशा अनुयायांमुळेच या तथाकथित बाबांचे धाडस वाढत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.
अशोक खरातसारखे गंभीर प्रकरण दापोलीत उघडकीस आले नसले तरी अशा प्रवृत्तींकडे वेळीच लक्ष न दिल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलीस व संबंधित प्रशासनाने या प्रकारांची दखल घेऊन संशयास्पद अड्ड्यांवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे. दरम्यान, अशोक खरात प्रकरणामुळे दापोलीत ‘भोंदूगिरी’ विरोधात काही प्रमाणात जागृती निर्माण झाली असून, आता प्रशासन यावर किती ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.