दापोलीतील लाडघर किनाऱ्यावर ‌‘तांबड्या लाटां‌’ची जादू 
रत्नागिरी

Dapoli Tourism : ‘तामसतीर्थ‌’चा सुर्यास्त नजराणा विलोभनीय!

दापोलीतील लाडघर किनाऱ्यावर ‌‘तांबड्या लाटां‌’ची जादू; पर्यटकांना पडतेय भुरळ

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण शिंदे

दापोली : कोकण किनारपट्टीवर निसर्गाची अनेक रूपे पाहायला मिळतात; मात्र लाडघर बीच येथे अनुभवायला मिळणारा ‌‘तांबडा समुद्र‌’ हा त्यातील सर्वात वेगळा आणि लक्षवेधी ठरतो आहे. समुद्राच्या पाण्याला काही ठिकाणी येणारी लालसर छटा पर्यटकांसाठी आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू बनली असून, अलीकडच्या काळात या किनाऱ्याकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे.

या तांबड्या रंगामागे कोणतेही रहस्य किंवा प्रदूषण नसून, किनाऱ्यावरील लाल माती आणि वाळूमधील लोहयुक्त घटक यामुळे पाण्याला ही नैसर्गिक छटा प्राप्त होते. विशेषतः भरतीच्या वेळी किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांमुळे हा रंग अधिक उठावदार दिसतो. त्यामुळे ‌‘तामसतीर्थ‌’ म्हणून ओळख मिळालेल्या या किनाऱ्याची ओळख आता राज्यभर पसरत आहे.

दापोली शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला हा किनारा शांत, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त असल्याने कुटुंबांसह पर्यटनासाठी उत्तम पर्याय ठरत आहे. गर्दीच्या समुद्रकिनाऱ्यांपासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची संधी येथे मिळते. सकाळच्या शांत लाटा आणि संध्याकाळच्या मोहक सूर्यास्तामुळे हा परिसर दिवसाच्या प्रत्येक प्रहरात वेगळाच भासतो. या किनाऱ्याला धार्मिक महत्त्व देखील आहे. अस्थि विसर्जन करण्यासाठी तसेच विविध धार्मिक विधी करण्यासाठी या किनाऱ्यावर भाविक मोठ्या संख्येने येतात. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या गोड्या पाण्याच्या विहिरी हे देखील या ठिकाणाचे विशेष आकर्षण मानले जाते. समुद्राजवळ असूनही या विहिरींमध्ये गोडे पाणी उपलब्ध असल्याने पर्यटकांमध्ये याबाबत विशेष उत्सुकता पाहायला मिळते.

स्थानिक व्यावसायिकांनाही यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत असून, गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ‌‘मिनी महाबळेश्वर‌’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दापोलीतील हा तांबडा समुद्र आता केवळ भौगोलिक वैशिष्ट्य न राहता, निसर्गप्रेमींसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT