House Burglary Pudhari
रत्नागिरी

Dapoli house burglary : दापोलीत दिवसाढवळ्या घरफोडी; सव्वातेरा लाखांचा मुद्देमाल चोरीला

गव्हे पवारवाडी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

जालगाव : दापोली तालुक्यातील गव्हे पवारवाडी येथे भरदिवसा घराचा दरवाजा फोडून चोरट्यांनी १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. भैरी देवीच्या यात्रेनिमित्त कुटुंबीय घराबाहेर गेले होते. यादरम्यान ही चोरी झाली. यामध्ये रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. चोरीप्रकरणी फिर्यादीने आपल्या शेजाऱ्यावरच संशय व्यक्त केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गव्हे पवारवाडी येथील रहिवासी अशोक गोविंद पवार (वय ५१) हे आपल्या कुटुंबासह शुक्रवारी (दि.१०) गावातील भैरी देवीच्या यात्रेसाठी गेले होते. दुपारी ३ ते ५ च्या सुमारास घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी घराच्या मागील बाजूच्या सिमेंटच्या दरवाजाला कोयता, पक्कड आणि चाकूच्या साहाय्याने छिद्र पाडले. त्यानंतर दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर चावीच्या मदतीने उघडून त्यातील ऐवज चोरला. यामध्ये १ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि सुमारे ११ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ज्यात पाच विविध प्रकारचे गंठण, हार आणि चपली हार यांचा समावेश आहे. असा एकूण १३ लाख २० हजार रुपयांचा माल चोरीला गेला आहे. याबाबत दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून दापोली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT