प्रवीण शिंदे
दापोली : निसर्गसौंदर्याबरोबरच आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या दापोली तालुक्यात आता हिवाळ्याची चाहूल चांगलीच जाणवू लागली आहे. ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीचा पारा गुरुवारी थेट ९.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. तापमानातील या घसरणीमुळे तालुक्यात थंडीची सुखद चाहूल जाणवली. सकाळच्या आणि रात्रीच्या वातावरणात थंडीचा विशेष अनुभव येत आहे.
गेल्या काही दिवसांतील तापमानाचा आलेखही लक्षवेधी ठरत आहे. दि. १६ नोव्हेंबरला किमान तापमान ११.७ अंश, १७ नोव्हेंबरला १२.५ अंश, १८ नोव्हेंबरला १२.९ अंश, तर १९ नोव्हेंबरला १३.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. त्यानंतर अवघ्या एका दिवसात तापमानात मोठी घसरण होऊन पारा ९.४ अंशांवर पोहोचला आहे. थंडीच्या या बदलत्या वातावरणामुळे दापोलीत येणाऱ्या पर्यटकांना गुलाबी थंडीचा आनंद लुटण्याची संधी मिळत आहे.
दुसरीकडे, या थंडीच्या आगमनाकडे आंबा व काजू बागायतदारांचेही लक्ष लागले आहे. विशेषतः हापूस आंब्याच्या मोहोरासाठी पोषक हवामान निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. काजू पिकासाठीही हंगामाच्या दृष्टीने हे वातावरण महत्त्वाचे ठरू शकते. एकीकडे पर्यटकांसाठी आल्हाददायक ठरणारी ही थंडी, तर दुसरीकडे कोकणच्या बागायतदारांसाठी नव्या हंगामाच्या आशा घेऊन आली आहे. त्यामुळे दापोलीत सध्या निसर्गाचा गारवा व बागायतदारांच्या अपेक्षा असे दोन्ही चित्र पाहायला मिळत आहे.