दापोली : दापोली शहरात दरड आणि संरक्षण भिंत कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहे. त्यामुळे इमारतींना याचा धोका निर्माण झाला आहे. दापोलीत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील फॅमिली माळ परिसरात संरक्षक भिंत कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. या घटनेमुळे मकबुल कासम कोंडविलकर यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे.
सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली, तरी येथील रहिवासी वस्तीला याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. फॅमिली माळ परिसरात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटनेमुळे येथील रहिवासी यांनी स्थलांतरित होण्याची तयारी दाखवली असून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाने तत्काळ बचाव आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. तर आपत्ती व्यवस्थापन पथकाने याठिकाणी भेट देऊन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.