दापोलीत ‌‘हाय-प्रोफाईल‌’ गुंतवणुकीची चर्चा File Photo
रत्नागिरी

Ratnagiri News : दापोलीत ‌‘हाय-प्रोफाईल‌’ गुंतवणुकीची चर्चा

राजकीय आश्रयाचा प्रश्न अधिक गडद; मालमत्तांचे दर गगनाला भिडले!

पुढारी वृत्तसेवा

दापोली : पर्यटन तालुका म्हणून ओळख असलेल्या दापोलीत गेल्या काही वर्षांत जमिनींच्या खरेदी-विक्रीला मोठी चालना मिळाली आहे. निसर्गसंपन्न किनारे, वाढते पर्यटन आणि उच्चभ्रू प्रकल्पांमुळे येथील मालमत्तांचे दर गगनाला भिडले असून राज्याबरोबरच देशभरातील गुंतवणूकदारांनी येथे मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक केल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

भोंदू बाबाच्या मालमत्तांवरून चर्चा

या पार्श्वभूमीवर, काही तथाकथित भोंदू बाबा तसेच ‌‘हाय-प्रोफाईल‌’ व्यक्तींच्याही दापोलीतील मालमत्तांबाबत विविध चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. विशेषतः नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याची दापोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी असल्याचे उघडपणे बोलले जात असून, ही मालमत्ता त्या भोंदू बाबाला कोणाच्या माध्यमातून मिळाली, असा प्रश्न आता स्थानिक स्तरावर उपस्थित केला जात आहे.

प्रॉपर्टी व्यवहारात राजकीय पाठबळ?

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याला दापोलीत मालमत्ता घेऊन देण्यात कोणत्या राजकीय मंडळींचा सहभाग आहे का? असे प्रश्नही विचारले जात आहेत. तसेच पर्यटन क्षेत्रात जर अशा व्यक्तींची मालमत्ता अस्तित्वात असेल तर त्यामागे नेमका आशीर्वाद कोणाचा, असा सूरही नागरिकांमध्ये उमटताना दिसत आहे.

जमीन व्यवहार मुद्दा ऐरणीवर

दरम्यान, या सर्व चर्चांमुळे दापोलीतील जमीन व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पर्यटनवाढीमुळे तालुक्याचा विकास होत असला तरी अशा ‌‘हाय-प्रोफाईल‌’ व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. स्थानिकांच्या मते, “दापोलीचा विकास महत्त्वाचा असला तरी तो पारदर्शक आणि नियमबद्ध असणे तितकेच गरजेचे आहे.” त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT