रत्नागिरी : वाडीत ना रस्ता, ना वीज...5 किलोमीटर पायपीट... असे मुख्य प्रवाहापासून दूर असलेले संगमेश्वर तालुक्यातील दख्खन धनगर वाडीतील ग्रामस्थ अनेक समस्यांशी सामना करत आहेत. स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही तसेच सध्याच्या डिजिटल युगात या वाडीतील कुटुंब मरणयातना भोगत आहे. वाडीत रस्ताच नसल्याने प्रसूती घरातच करावी लागत आहे. पूर्वी या वाडीत 50 कुटुंबे होती, आता नऊवर आली आहेत. साहेब आता तुम्हीच सांगा कसं जगायचं ते... असा सवाल ही कुटुंबे करत आहेत.
आंबा घाटातील एका दरीत वसलेली दख्खन धनगरवाडी... पूर्व लोकवस्ती असलेली 9 कुटुंब. जागेअभावी वस्तीपर्यंत रस्ता पोहोचला नाही, महावितरणला परवडत नाही म्हणून लाईट नाही. अर्थात, नागरी सुविधा पासून वंचित असल्याने तात्पुरत्या स्वरूपात अनेक कुटुंबे स्वतःच घर-दार शिवार सोडून स्थलांतरीत झाली आहेत.मात्र परिस्थिती अभावी इथल्याच मातीत रहाणं भाग पडलेलं कुटुंब आदिवासी जीवन जगत आहे.
आंबा घाटातील कळकदरा स्टॉप च्या पश्चिमेला एका खोल दरीत धनगरवाडी पूर्व गावची लोकवस्ती आहे. धनगर बांधवांचा शेती आणि पशुपालन हा प्रमुख व्यवसाय असल्याने जनावरांना पुरेसा चारा मिळावा यासाठी पूर्वजांनी या ठिकाणाची निवड केली. मात्र सध्याच्या पिढीला सोयीअभावी मरण यातना भोगाव्या लागत आहेत. वस्तीत वीजपुरवठा व्हावा यासाठी रीतसर मागणी आणि 7 कुटुंबांनी वीज मीटरची 2017 साली देयक भरणा केले. मात्र या प्रकारास आठ वर्षे उलटून गेली तरी अंमलबजावणीचा पत्ता नाही. लोकशाही दिनात सुद्धा या विषयावर आवाज उठवण्यात आला होता.
डिजिटल युगात वीजे शिवाय पर्याय नाही.मात्र या वाडीतील नवीन पिढीतील कुटुंबांना विजेच्या सोयी अभावी एक एक करत घरं दारं शेत - शिवार मनाविरूद्ध सोडावं लागलं. मात्र परिस्थिती अभावी 90 वर्षाची वृद्धा, तिचा मुलगा, सुन आणि तीन सहा वर्षाखालील नातवंडे असे 6 जण प्रतिकूल परिस्थिती वर मात करत हलाखीचे जीवन जगत आहेत. सभोवती घनदाट जंगल, बिबटे, गवे,कोल्हे, कोळसुंदे अशी हिंस्त्र श्वापदे यांचा मुक्तवावर त्यातच रात्रभर पूर्ण अंधार..! अशा भयावह परिस्थितीशी तोंड देत एक एक दिवस पुढे ढकलणार्या या कुटुंबाच्या घरी वीज कधी पोहचणार? असा सवाल या कुटुंबांनी केला आहे. गावापासून कमीत कमी 5 कि.मी पायपीट करून या वाडीत जावे लागते. डोंगर दर्यातून वाट असल्याने रात्री जाणे जिकरीचे असते. माणूस आजारी पडला तर डोलीतून आणावे लागते. गरोदर महिलांना तर मुश्कलीचे बनते. त्यामुळे प्रसुती ही वाडीतच केली जाते. ना डॉक्टर ना कोणत्या आरोग्य सेवा घराच्या घरी प्रसुती केली जाते.
या वाडीत जागेअभावी रस्ता गेला नाही. आम्ही याबाबत वारंवार प्रयत्न केले; मात्र जमीन मालकांची संख्या जास्त असल्याने हे होऊ शकले नाही. या वाडीत घरकुल मंजूर आहेत; पण रस्त्याअभावी रखडली आहेत. महावितरणने सुद्धा वीज देण्याबाबत दुर्लक्ष केले आहे.- मंगेश दळवी, माजी सरपंच, दख्खन-मुर्शी