देवगड : देवगड-जामसंडे नगर पंचायतीची विशेष सर्वसाधारण सभा गुरुवारी नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत ठेकेदारांच्या अपूर्ण आणि निकृष्ट कामांवरून जोरदार वाद झाला. नगरसेवक नितीन बांदेकर यांनी ठेकेदारांना वेळेवर काम पूर्ण करता येत नसतानाही त्यांना वाढीव मुदत का दिली जाते, असा सवाल करत प्रशासनाच्या भूमिकेवर टीका केली. तसेच, बेकायदेशीर निर्णय घेतल्यास प्रशासनाची गय केली जाणार नाही, असा इशाराही दिला.
सभेत नळधारकांना नोटीस पाठविण्याच्या प्रक्रियेला विरोध झाला. पंतप्रधान आवास योजनेत निकृष्ट काम करून लाभार्थ्यांचे जीव धोक्यात येऊ नयेत, यासाठी दर्जेदार कामाची मागणी करण्यात आली. नगरसेवक संतोष तारी यांनी काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदारांना बिले अदा करू नये, अशी सूचना केली. तर नगरसेवक बुवा तारी यांनी काही अपात्र ठेकेदारांना काम देऊन बिले दिल्याचा आरोप केला.
यावेळी दहिबाव पाणी पुरवठा योजनेतील अनियमिततांवरही चर्चा झाली. ठेकेदाराने परवानगीशिवाय निधीचा वापर केल्याचे निदर्शनास आणून दिले गेले. गणेशोत्सवपूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, स्मशानभूमीतील अस्वच्छतेवर उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही सभागृहात देण्यात आल्या. दहिबाव नळयोजनेतील गळतीचे प्रमाण वाढल्यामुळे भविष्यात पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. यावर कार्योत्तर मंजुरी घेऊन दुरुस्तीचे काम तातडीने करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली. या चर्चेत नगरसेविका तन्वी चांदोस्कर, अरुणा पाटकर, मनीषा जामसंडेकर आदींनी सहभाग घेतला.