चिपळूण : चिपळूण तालुका काँग्रेसच्यावतीने आज महावितरण कार्यालयावर धडक देण्यात आली. ग्राहकांना न सांगता तालुक्यात स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. त्याला आमचा विरोध आहे. या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. डिजिटल मीटर चांगले असताना स्मार्ट मीटरची सक्ती कशाला? स्मार्ट मीटर बसविणे न थांबविल्यास महाविकास आघाडी महावितरण कार्यालयावर आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी दिला. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांना निवेदन दिले.
शुक्रवारी (दि. 1) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास काँग्रेस कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांच्यासह महिला जिल्हाध्यक्षा विभावरी जाधव, माजी नगराध्यक्ष कबीर काद्री, रफिक मोडक, शहराध्यक्ष संतोष सावंतदेसाई, महिला तालुकाध्यक्षा निर्मला जाधव, शहराध्यक्षा लिना जावकर, माजी नगरसेविका सफा गोठे, अनिल रेपाळ, नंदू कामत, यशवंत फके, दादा आखाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. भामरे यांच्याशी चर्चा करण्यात आली. चिपळूण तालुक्यासह सर्वत्र जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. वीज ग्राहकांना कोणतीही कल्पना न देता गुपचुप स्मार्ट मीटर लावले जात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत बिलामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जर चिपळूण तालुक्यात स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केली तर काँग्रेस व महाविकास आघाडी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी महावितरणला देण्यात आला.
यावेळी श्री. भामरे म्हणाले की, या संदर्भात ग्राहकांची तक्रार असेल तर आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. ज्या ग्राहकांना स्मार्ट मीटर व डिजिटल मीटरची खात्री करायची आहे, त्यांनी तशी तक्रार दिल्यास त्या-त्या ठिकाणी दोन्ही मीटरचे प्रात्यक्षिक घेण्यात येईल. राज्य व केंद्र शासनाने स्मार्ट बसविण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित कंपनीकडून हे काम सुरू आहे. दोन्ही मीटरच्या वीज बिलांमध्ये कोणतीही तफावत नाही; मात्र ज्यांचे मीटर आधी सदोष होते त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविल्यानंतर बिलांमध्ये फरक येत आहे, त्यांच्याच तक्रारी येत आहेत, असे स्पष्ट केले.
यावेळी उपस्थितांनी, चिपळूण शहरात सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा त्रास वाढला आहे. दिवसभरात चार ते पाचवेळा वीजपुरवठा खंडीत केला जातो. याची कारणे स्पष्ट करावीत. वादळवारा नसतानाही वीजपुरवठा कसा काय खंडित केला जातो असा सवालही करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकार्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. या बाबत आपण लवकरच शहरातील प्रभागनुसार वीज वितरणबाबत आढावा घेऊ व सुधारणा करू, असे आश्वासन भामरे यांनी दिले.