‘राज’ आदेशामुळे पदाधिकार्‍यांत संभ्रम? pudhari
रत्नागिरी

Maharashtra Politics : ‘राज’ आदेशामुळे पदाधिकार्‍यांत संभ्रम?

नव्या समीकरणाचे कोडे; रत्नागिरीत शिवसेना उबाठा-मनसे कार्यकर्त्यांची वाढली धडधड

पुढारी वृत्तसेवा
दीपक कुवळेकर

रत्नागिरी : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वरळीत झालेल्या विजयी मेळाव्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेने शिवसेना (उबाठा गट) आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र, राज ठाकरे यांच्या नव्या आदेशामुळे हा उत्साह काहीसा ओसरला आहे. युतीबाबत कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करण्यापूर्वी माझी परवानगी घ्यावी, असे निर्देश त्यांनी पदाधिकान्यांना दिल्याने युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्याच्या राजकारणात रत्नागिरी जिल्हा नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहे. शिवसेना स्थापनेपासून रत्नागिरी जिल्हा सेनेच्या पाठी भक्कम उभा राहिला आहे. जिल्ह्यात 1990 पासून सेनेच्या झंझावाताला सुरुवात झाली ती आजतागायत तशीच आहे. 1990 ला शिवसेनेने विधानसभेत पहिली एंट्री केली. सेनेचे तब्बल 3 आमदार निवडून आले. संगमेश्वरात रवींद्र माने, खेडमधून रामदास कदम, दापोलीतून सूर्यकांत दळवी निवडून आले. यानंतर शिवसेनेने जिल्ह्यात कायम वर्चस्व ठेवले. यानंतर 1995 साली झालेल्या पुन्हा निवडणुकीत यश संपादन केले. 1999 च्या निवडणुकीतसुद्धा सेनेचा करिष्मा कायम राहिला.

विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थेतसुद्धा शिवसेनेने मुसंडी मारली. 1997 साली जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेेने एकतर्फी वर्चस्व मिळवले. विशेष म्हणजे 1997 पासून आजतागायत शिवसेनेचा भगवा जिल्हा परिषदेवर फडकत आहे. जिल्ह्यात मनसेची ताकदही बर्‍यापैकी आहे. मनसे स्थापन झाल्यानंतर खेडमध्ये पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान हा वैभव खेडेकर यांनी मिळवला होता. शिवसेनेचे रामदास कदम यांना आव्हान देत खेडमध्ये वैभव खेडेकर यांनी मनसेची सत्ता मिळवली होती. मनसेला काही प्रमाणात गटातटाच्या राजकारणाला सामोरे जावे लागले. यामुळे पक्षाची वाढ म्हणावी तशी झाली नाही. या गटातटाच्या राजकारणत मनसेला दक्षिण रत्नागिरीत चांगलाच फटका बसला.

हिंदी भाषा सक्तीबाबत महायुती सरकारने हा निर्णयच मागे घेतल्यानंतर वरळीत आयोजित संयुक्त मेळाव्यात रत्नागिरीत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या गळ्यात गळे घालत सोबतच वाजत गाजत निघाले होते. संपूर्ण ठाकरे कुटुंब एका मंचावर पाहिल्यानंतर दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते सुखावले. राज-उद्धव यांच्यातील दुरावा कायमस्वरूपी मिटला. त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारत जुन्या गोष्टींवर कायमस्वरूपी पडदा पाडला. या कार्यक्रमानंतर राज्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यात एक मोठा ट्विस्ट आला आहे. राज यांनी नुकतीच बैठक घेत त्यात त्यांनी ‘उबाठा’ सोबत युतीबाबत बोलताना पदाधिकार्‍यांनी सार्वजनिक ठिकाणी बोलण्यापूर्वी माझ्याशी संपर्क साधून परवानगी घ्यावी, असे निर्देश दिले. या आदेशामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT