Coconut price hike pudhari photo
रत्नागिरी

Coconut Price Hike | ऐन सणासुदीत नारळाचे दर प्रचंड वाढले; बजेट कोलमोडले

Coconut Price Hike | शेकड्यामागे 500 ते 1,000 रुपयांची वाढ; दरवाढीने गृहिणी हैरान

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूजेसह स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या नारळाच्या दरांनी अचानक उसळी घेतली आहे. बाजारात शेकडा नारळामागे तब्बल ५०० ते १,००० रुपयांनी दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. सणासुदीच्या दिवसांत नारळाची मागणी वाढलेली असताना आवक कमी झाल्याने दर वाढल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

या दरवाढीमुळे गृहिणींचे सणाचे बजेट कोलमोडले आहे. नारळ हा कोकणातील दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग आहे. चटणी, आमटी, भाज्या, गोड पदार्थांपासून विविध सणांच्या नैवेद्यापर्यंत नारळाचा वापर केला जातो. गणेशोत्सवात तर पूजाविधी आणि प्रसादासाठी नारळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.

त्यामुळे ऐन सणासुदीत दर वाढल्याने ग्राहकांना वाढीव पैसे मोजावे लागत आहेत. यंदा नारळाच्या उत्पादनावर हवामानातील बदल, अतिवृष्टी तसेच विविध नैसर्गिक कारणांचा परिणाम झाल्याचे उत्पादकांकडून सांगण्यात येते.

काही भागांत उत्पादन घटल्याने बाजारपेठेत अपेक्षितकी आवक होत नाही. त्यातच सणासुदीमुळे मागणी वाढल्याने उपलब्ध मालावर दबाव आला आहे. परिणामी, किरकोळ बाजारातील दर वाढले आहेत.

नारळाच्या वाहतुकीचा खर्च, मजुरी, तोडणी आणि बाजारातील हाताळणीचा खर्च वाढल्यानेही ग्राहकांना त्याचा भार सहन करावा लागत आहे. उत्पादनाच्या ठिकाणापासून बाजारपेठेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर खर्च वाढत गेल्याने अंतिम दरावर त्याचा परिणाम होत असल्याचे व्यापारी सांगतात.

दर नियंत्रणासाठी काय उपाय?

नारळाच्या दरवाढीवर दीर्घकालीन उपाय म्हणून स्थानिक पातळीवर नारळ उत्पादन वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. उत्पादकांना सुधारित लागवड तंत्रज्ञान, दर्जेदार रोपे, खत व्यवस्थापन आणि रोग-किडींवरील प्रभावी उपाय उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांच्या माध्यमातून थेट बाजारपेठ उपलब्ध केल्यास मध्यस्थांची संख्या कमी होऊन उत्पादक आणि ग्राहक या दोघांनाही फायदा होऊ शकतो.

सणासुदीच्या काळात मागणी-पुरवठ्याचा आढावा घेऊन बाजार समित्या व संबंधित यंत्रणांनी दरांवर लक्ष ठेवणे, अनाठायी साठेबाजी किंवा कृत्रिम टंचाई निर्माण होत नाही ना, याची तपासणी करणे आवश्यक आहे. पुरेशी आवक राहण्यासाठी कृषी व पणन विभागाने उत्पादक, व्यापारी आणि विक्रेत्यांशी समन्वय साधण्याची गरज आहे.

दरवाढीचा फटका थेट ग्राहकांना

पूर्वी शेकड्याने नारळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता त्याच प्रमाणात अधिक पैसे मोजावे लागत आहेत. सणासाठी मोठ्या प्रमाणात नारळ खरेदी करणाऱ्या कुटुंबांच्या खर्चात त्यामुळे लक्षणीय वाढ झाली आहे. किरकोळ विक्रेत्यांकडेही ग्राहकांकडून दराबाबत विचारणा घडली असून 'नारळाचे दर एवढे का वाढले?' असा सवाल केला जात आहे.

ठोस नियोजन करण्याची गरज

सणाच्या तोंडावर नारळाच्या दराने घेतलेली उसळी ही केवळ ग्राहकांच्या बजेटची समस्या नसून उत्पादन, वाहतूक, बाजारव्यवस्था आणि मागणी-पुरवठ्याच्या साखळीतील त्रुटी अधोरेखित करणारी आहे. त्यामुळे तात्पुरत्या उपायांबरोबरच नारळ उत्पादन वाढविण्यासाठी ठोस नियोजन करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT