Coconut Pudhari
रत्नागिरी

Coconut Price Hike : ऐन सणासुदीत नारळाचे दर प्रचंड वाढले, शेकड्यामागे ५०० ते १,००० रुपयांची वाढ; गृहिणींचे बजेट कोलमडले

हवामानातील बदल, अतिवृष्टी तसेच विविध नैसर्गिक कारणांचा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूजेसह स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या नारळाच्या दरांनी अचानक उसळी घेतली आहे. बाजारात शेकडा नारळामागे तब्बल ५०० ते १,००० रुपयांनी दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. सणासुदीच्या दिवसांत नारळाची मागणी वाढलेली असतानाच आवक कमी झाल्याने दर वाढल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या दरवाढीमुळे गृहिणींचे सणाचे बजेट कोलमडले आहे.

नारळ हा कोकणातील दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग आहे. चटणी, आमटी, भाज्या, गोड पदार्थांपासून विविध सणांच्या नैवेद्यापर्यंत नारळाचा वापर केला जातो. गणेशोत्सवात तर पूजा विधी आणि प्रसादासाठी नारळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे ऐन सणासुदीत दर वाढल्याने ग्राहकांना वाढीव पैसे मोजावे लागत आहेत.

यंदा नारळाच्या उत्पादनावर हवामानातील बदल, अतिवृष्टी तसेच विविध नैसर्गिक कारणांचा परिणाम झाल्याचे उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे.

दरवाढीचा फटका थेट ग्राहकांना

पूर्वी शेकड्याने नारळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता त्याच प्रमाणात अधिक पैसे मोजावे लागत आहेत. सणासाठी मोठ्या प्रमाणात नारळ खरेदी करणाऱ्या कुटुंबांच्या खर्चात त्यामुळे लक्षणीय वाढ झाली आहे. किरकोळ विक्रेत्यांकडेही ग्राहकांकडून दराबाबत विचारणा वाढली असून ‘नारळाचे दर एवढे का वाढले’ असा सवाल केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT