रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी महायुतीचे सरकार पूर्ण ताकदीने काम करत असून, आगामी काळात कोकणचा कायापालट करणे हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ही निवडणूक केवळ पदासाठी नसून रत्नागिरीच्या भविष्यासाठी आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदान केले तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिवसेना-भाजप महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, भाजपाचे ॲड. दीपक पटवर्धन, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, महेश म्हाप, उपजिल्हाप्रमुख संजू साळवी, सुदेश मयेकर, भाजपा तालुकाध्यक्ष दादा दळी, रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, मुंबईतील माजी नगरसेविका संजना घाडी, भाजपा तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, प्रतिक देसाई यांच्यासह रत्नागिरी, लांजा, राजापूर व संगमेश्वरमधील महायुतीचे उमदेवार उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांचा समाचार घेत विकासाचा नवा संकल्प मांडला. सभेच्या सुरुवातीला ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या झेंड्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ते म्हणाले की, रत्नागिरी ही क्रांतीकारकांची आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे. या मातीने नेहमीच सत्याला आणि विकासाला साथ दिली आहे. आज साळवी स्टॉप येथे झालेली ही गर्दी पाहता, येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचेच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही विकासाची मुख्य केंद्रे असून, तिथे सक्षम नेतृत्व असणे गरजेचे आहे. आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. ते म्हणाले की, आमचे सरकार हे फेसबुकवरून चालणारे नसून प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणारे सरकार आहे. आम्ही सर्वसामान्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन निर्णय घेतो. कोकणातील काजू-आंबा उत्पादक शेतकरी असो वा मच्छीमार बांधव, प्रत्येकाच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासोबतच ग्रामीण भागातील रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सुविधांना आम्ही प्राधान्य दिले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता कधीही पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
विरोधकांवर टीकास्त्र सोडताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, काहींनी सत्तेसाठी विचार बाजूला ठेवले, पण आम्ही बाळासाहेबांचे विचार आणि सामान्य शिवसैनिकाचा स्वाभिमान जपण्यासाठी सत्तेचा त्याग करून जनतेच्या न्यायासाठी बाहेर पडलो. आज राज्यातील जनता आमच्या पाठीशी आहे कारण त्यांना शब्दांपेक्षा काम हवे आहे. ही निवडणूक केवळ पदासाठी नसून रत्नागिरीच्या भविष्यासाठी आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदान करावे. शेवटी, उपस्थित कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करताना त्यांनी सांगितले की, आता विश्रांतीची वेळ नाही. मतदानाच्या दिवसापर्यंत प्रत्येक मतदाराच्या दारापर्यंत पोहोचा आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा. “धनुष्यबाण“ आणि “कमळ“ यांच्या एकत्रित शक्तीने रत्नागिरीचा विकास रथ अधिक वेगाने धावेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी भाषणाचा समारोप केला.