रत्नागिरी : राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अंतर्गत गावागावांमध्ये स्वच्छतेच्या ज्या सोयी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्याचा ग्रामस्थांनी नियमित वापर करुन आपले गाव स्वच्छ ठेवणे हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू या मोहिमेचा जिल्ह्यात प्रारंभ करण्यात आला.
रत्नागिरी तालुक्यातील पानवल ग्रामपंचायत येथे वैदेही रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, गावातील सर्व कुटुंबातील कचर्याचे वर्गीकरण केले पाहीजे. तसेच कचर्यापासून सेंद्रिय खत तयार करुन गावातील फळझाडे व शेतीसाठी त्याचा उपयोग करुन गाव स्वच्छ व सुंदर ठेवले पाहीजे. तसेच या अभियानाची प्रचार प्रसिद्धी गावसभा घेऊन सर्व कुटुंबापर्यंत हा संदेश पोहोचवला पाहीजे, असे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी या अभियानाची माहिती देत असताना राहुल देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) म्हणाले की, गावातील लोकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेची जाणीव जागृती निर्माण झाली पाहीजे. तसेच हे अभियानामध्ये गाव स्वच्छ सुंदर करुन लोकांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची स्वच्छता सातत्यपूर्ण ठेवावी तसेच प्रत्येक कुटुंबातील कचर्याचे वर्गीकरण करुन गावातील सार्वजनिक नॅडेप खड्डा या मोहिमेत भरुन त्याचे खत निर्माण करुन ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळाले पाहीजे. जेणेकरून ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चेतन शेळके, विस्तार अधिकारी पी. एन. सुर्वे, जिल्हा कक्षातील सर्व सल्लागार, पानवल ग्रामपंचायतीच्या सरपंच तनिष्का होरंबे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच गावातील नागरीक कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्तावना व आभार उपसरपंच रवींद्र मांडवकर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.