दापोली: आमसभेत बोलताना आमदार योगेश कदम आणि अन्य मान्यवर. 
रत्नागिरी

Ratnagiri | छोट्या-छोट्या प्रश्नांची उत्तरे आमदार साहेब तुम्हीच देणार

Citizens question MLA in public meeting- आमसभेत नागरिकांचा थेट सवाल; स्थानिक पदाधिकारी, यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

दापोली : "आमदार साहेब, अशा लहान-नहान प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी तुम्हाला आमसभेत बोलावे लागत असेल, तर तुमच्या डाव्या-उजव्या बाजूला बसलेले नेमके काय करतात?" असा थेट सवाल एका ग्रामस्थाने आमसभेत आमदार तथा मंत्री योगेश कदम यांच्यासमोर उपस्थित केला. १० सप्टेंबर रोजी राधाकृष्ण मंदिर हॉल येथे झालेल्या आमसभेत विचारण्यात आलेल्या या प्रश्नामुळे स्थानिक पदाधिकारी आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

पंचायत समिती तसेच स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून सहजपणे नार्गी लागू शकणारे प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडवणे अपेक्षित आहे. नात्र, अशा प्रश्नांसाठीही नागरिकांना येट आमसभेपर्यंत यावे लागत असेल तर स्थानिक यंत्रणा, पदाधिकाऱ्यांची भूमिका नेमकी काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला.

आमसभेत एसटी सेवा, महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. या स्थानिक प्रश्नांवर बराच वेळ खर्च झाल्याने तालुक्याच्या व्यापक विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांना अपेक्षित वेळ मिळू शकला नाही. अनेक प्रश्न केवळ चर्चेपुरतेच राहिल्याचेही चित्र दिसून आले.

यातील अनेक प्रश्न पंचायत समितीच्या कार्यक्षेत्राशी संबंधित आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही पाठपुरावा केल्यास अनेक प्रश्न आमदारांच्या पातळीवर नेण्याची वेळच येणार नाही, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मात्र, स्थानिक पातळीवर प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांना अखेर आमसभेचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून आले.

दापोली रोजगारनिर्मिती, तालुक्यात पर्यटनविकास भविष्यातील विकासाचे नियोजन, मूलभूत सुविधा आणि दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय यावर व्यापक चर्चा होणे अपेक्षित असताना, स्थानिक पातळीवर निकाली काढता येणाऱ्या प्रश्नांवर आमसभेचा वेळ खर्च होत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, नागरिकांनी मांडलेले प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशा स्पष्ट सूचना आमदार योगेश कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. प्रश्न प्रलंबित ठेवू नयेत आणि त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी तंबीही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली. आगामी काळात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ते आमदारांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा या आमसभेनंतर व्यक्त होत आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या आमसभेला सभापती उन्मेश राजे, उपसभापती नम्रता तोडणकर, उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, नगराध्यक्ष कृपा घाग, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT