चिपळूण : तालुक्यात पंचायत समितीच्या 18 आणि जिल्हा परिषदेच्या 9 जागांसाठी सुरू असलेला जाहीर प्रचार गुरुवारीसायंकाळी थंडावला. या निवडणुकीसाठी 7 रोजी मतदान होत असून त्याची जय्यत तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. तालुक्यातील 245 केंद्रावर मतदान होणार आहे. यामध्ये 90 हजार 935 पुरूष, तर 92 हजार 738 महिला मतदार असे एकूण 1 लाख 83 हजार 673 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या निवडणुकीसाठी 7 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 दरम्यान मतदान होणार असून 9 फेब्रुवारीस मतमोजणी केली जाणार आहे. कळवंडे, पेढे, खेर्डी, अलोरे, शिरगांव, सावर्डे, उमरोली, वहाळ, कोकरे या 9 जिल्हा परिषद गटात निवडणूका होत आहेत, तर पंचायत समितीसाठी भोम, कळवंडे, खेर्डी, कापसाळ, अलोरे, पिंपळी खुर्द, वेहेळे, शिरगाव, सावर्डे, मांडकी, उमरोली, गुढे, निवळी, वहाळ, कोकरे आणि कुटरे या 18 गणात विजयासाठी संबंधित उमेदवारांचा कस लागणार आहे. या निवडणुकीत 245 केंद्रांवर मतदान होणार आहे. यातील 31 मतदान केंद्रात 1 हजारहून जास्त मतदारांची संख्या आहे. पेढे येथे 1149 मतदारांचे सर्वात मोठे केंद्र असून गुढे येथे सर्वाधिक कमी 192 मतदारांची संख्या असलेले केंद्र आहे. यावेळी 4046 मतदार हे दुबार मतदार आढळले आहेत. मात्र त्यांना कोणत्याही एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे. त्यासाठी संबंधीत दुबार मतदारांचे प्रशासनाकडून लेखी पत्र घेण्यात आले आहे.
या निवडणुकीसाठी 340 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच 3 फिरते भरारी पथक कार्यरत राहिले. पेढे फरशी तिठा, कुंभार्ली चेक पोस्ट, खेरशेत टोलनाका, मार्गताम्हाने सुरळ फाटा, आबलोली मुर्तवडे फाटा येथे स्थिर सर्व्हेक्षण पथके तैनात ठेवली होती. आचारसंहिता सुरू झाल्यापासून आजतागायत ही पथके कार्यरत असली तरी कुठेही कारवाई झालेली नाही. मात्र आता मतदानाच्या पार्श्वभूमीवर ठिक-ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील युनायटेड हायस्कूलच्या गुरूदक्षिणा सभागृहात 9 रोजी मतमोजणी केली जाणार आहे. येथूनच मतदान केंद्राचे साहित्य व मतपेट्यांचे वितरण केले जाणार असल्याने या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त आतापासून ठेवण्यात आला आहे.