चिपळुणात व्यापारी संघटनेचे ग्राहकांना भावनिक आवाहन 
रत्नागिरी

Ratnagiri News : शेतकर्‍यांसाठी दुष्काळ... व्यापार्‍यांचे काय?

चिपळुणात व्यापारी संघटनेचे ग्राहकांना भावनिक आवाहन

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना चिपळूणच्या व्यापारी महासंघटनेने आपल्या ग्राहकांसाठी दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर अनोखे आवाहन केले आहे आणि सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. व्यापारी संघटनेच्यावतीने शहरातील मुख्य रस्त्यांवर बाजारपेठेत आणि एसटी बसस्थानकाजवळ कमानी उभारून ‘शासनाने शेतकर्‍यांसाठी दुष्काळ जाहीर केला. मग व्यापार्‍यांचे काय? त्यांना वाली कोण?’ अशा स्वरूपाचा प्रश्न उपस्थित केला आहे.

यावर्षी पाऊस कमी झाला. यामुळे राज्यावर दुष्काळाचे संकट आहे. कोकणात देखील दरवर्षीप्रमाणे पावसाची सरासरी झाली नाही. अखेरच्या टप्प्यात कोकणात पाऊसच झाला नाही. परिणामी, येथील भात, नाचणीची शेती अडचणीत सापडली आहे. भात कापणीच्या कालावधीत अवकाळी पाऊस पडल्याने देखील नुकसान झाले आहे. याचा विपरित परिणाम फळ बागायतींवर देखील होणार आहे. या पार्श्वभूमीवर येथील शेतकरी चिंताग्रस्त असताना आता व्यापार्‍यांनीही ऐन दिवाळीत प्रश्न उपस्थित केला आहे. शासनाने शेतकर्‍यांना दुष्काळ जाहीर केला. मग व्यापार्‍यांचे काय? असा सवाल करून भावनिक आवाहन केले आहे.

बाजारपेठेतील मुख्य चौकात अशा भव्य कमानी लावण्यात आल्या आहेत. त्यावर ग्राहकांना साद घालण्यात आली आहे. ‘दिवाळीची खरेदी स्थानिक व्यावसायिकांकडूनच खरेदी करा. स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी झाली तर स्थानिक रोजगार वाढतो. व्यापारी आणि ग्राहक यांच्या नातेसंबंधांना बळ मिळते. आपल्या पैशाची शहरातच उलाढाल होते. स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होते आणि त्यातून आपल्या समाजाचा विकास होतो. व्यापारी स्थानिक कार्यक्रमांना सहकार्य करतात. त्यामुळे ग्राहकांनी स्थानिक बाजारतूनच दिवाळीची खरेदी करा’ असे आवाहन ठिकठिकाणी लावलेल्या कमानीतून करण्यात येत आहे. चिपळूण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष किशोर रेडीज, कार्याध्यक्ष कांता चिपळूणकर व सचिव उदय ओतारी यांनी हे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT