Crime News Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri ST bus incident | चिपळूण-तिवरे एसटी बसमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा राडा

चालकासह वाहकास मारहाण; गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : चिपळूण-तिवरे या एस.टी. बसमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने बस चालक आणि वाहकासोबत हुज्जत घालत त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना कळकवणे फाट्याजवळ घडली आहे.

या प्रवाशाने केवळ शिवीगाळच केली नाही, तर चालकाच्या शर्टाचा खिसा फाडून त्याला जखमी केले, तसेच झटापटीत वाहकाचे पैसेही गहाळ झाले आहेत. याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात संबंधित प्रवाशाविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च रोजी सायंकाळी ४.१५ वाजेच्या सुमारास एसटी बस (क्र. एमएच २० बीएल २४३७) तिवरे गावाकडे जात असताना हा प्रकार घडला. बसमधील प्रवासी प्रकाश बाबा कोकरे (३१, रा. नांदिवसे) हा दारूच्या नशेत प्रवास करत होता. त्याचे तिकीट कळकवणे फाट्यापर्यंतच असल्याने वाहक पाराजी सरवदे यांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले. याचा राग येऊन प्रकाश कोकरे याने वाहक आणि चालक उमेश सुखदेव हजारे (वय ३६) यांच्याशी विनाकारण वाद उकरून काढला.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने चालकाला हाताने मारहाण केली, ज्यामध्ये चालकाच्या चेहऱ्यावर नखे लागून दुखापत झाली आहे. या झटापटीत चालकाच्या शर्टाचा खिसा फाटला असून वाहकासोबत झालेल्या धक्काबुक्कीत त्यांच्या खिशातील ८०० रुपये गहाळ झाले आहेत. शासकीय कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी चालक उमेश हजारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रकाश कोकरे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT