चिपळूण : चिपळूणात स्कूल वाहन चालकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. पीडित मुलीने याबाबतची तक्रार चिपळूण पोलीस स्थानकात दिली असून पोलिसांनी स्कूल वाहन चालकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.
वहाब खालिद वावेकर असे त्या स्कूल वाहन चालकाचे नाव आहे. चिपळूण परिसरातील विद्यार्थी -विद्यार्थिनी त्याच्या वाहनाने प्रवास करतात. बुधवारी वहाब याने आपल्या वाहनातून प्रवास करणाऱ्या एका विद्यार्थिनीचाच विनयभंग केल्याची गंभीर घटना घडली. संबंधित पीडित विद्यार्थिनीने याबाबतची सर्व हकीकत आपल्या पालकांना सांगितल्यानंतर पालकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. संतापलेल्या पालकांनी व नागरिकांनी याबाबतचा जाब विचारत वहाब याला यथेच्छ प्रसादही दिला. त्यानंतर सायंकाळी त्याच्याविरोधात चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पाऊले उचलली. अल्पवीयन मुलीचा विनयभंग करणाऱ्या वाहन चालकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्या वाहन चालकावर एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान, या घटनेचे वृत्त गुरूवारी चिपळूण शहरात पसरले आणि नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. संबंधित वाहन चालकाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. या मागणीसाठी चिपळुणातील नागरिक पोलीस स्थानकावर धडकणार असल्याची माहितीही मिळत आहे.