चिपळूण : पालवण येथील पहिल्या ग्रामीण कृषी सहकार मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी बोलताना प्रा. डॉ. मिलिंद जोशी, संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे, आमदार शेखर निकम, प्रकाश देशपांडे, श्री. आरेकर, अरुण इंगवले, डॉ. निखिल चोरगे आदी. 
रत्नागिरी

Milind Joshi| शिक्षण देताना डोक्याबरोबरच पोटाचा विचार व्हावा : प्रा. डॉ मिलिंद जोशी

पहिल्या ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाचा थाटात समारोप

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : शिक्षण, कृषी आणि सहकार हा ग्रामीण विकासाचा त्रिवेणी संगम आहे. जग आता झपाट्याने बदलत असून केवळ बौद्धिक पाट्या टाकून उपयोगाचे नाही. शिक्षणात परिवर्तनाची क्रांती घडवण्याचे सामर्थ्य आहे. उच्च शिक्षणानंतरही सध्या बेकारीचा मोठा भयावह प्रश्न उभा राहतोय. भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहताना तरूणांच्या पोटाचा प्रश्न सुटला नाही, तर ही स्वप्ने फोल ठरतील. त्यामुळे शिक्षण देताना केवळ डोक्याचाच नव्हे तर पोटाचाही विचार केला पाहिजे, असे ठाम मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलींद जोशी यांनी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी व्यक्त केले.

तालुक्यातील मांडकी पालवण येथे कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने तीन दिवस चाललेल्या राज्यातील पहिल्या ग्रामीण कृषी सहकार संमेलनचा समारोप रविवारी झाला. यावेळी प्रा. जोशी बोलत होते. ते म्हणाल की, महाराष्ट्रात ग्रामीण साहित्य संमेलन, कृषी आणि सहकार संमेलन होत असतात. मात्र, या तिन्ही विषयांचा एकत्रित विचार करणारे संमेलन ही महत्त्वाची पायरी आहे, मराठी साहित्य, कथा, कादंबऱ्या आणि चित्रपटांमध्ये सहकार क्षेत्राचे अनेकदा नकारात्मक चित्रण झाले. प्रत्येक क्षेत्रात त्रुटी असतात; मात्र त्यामुळे संपूर्ण सहकार चळवळीची प्रतिमा कलुषित करणे योग्य नाही. ग्रामीण अर्थकारण समृद्ध करण्यात सहकार संस्थांचे मोठे योगदान आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. मात्र, आपला देश महासत्ता होण्याची स्वप्ने पाहताना तरुणांच्या ‌‘पोटा‌’चा प्रश्न सुटला नाही, तर ही स्वप्ने फोल ठरतील. आता पोटाचा विचार करणारे शिक्षण द्यायला हवे. केवळ पदवीधर तयार करून चालणार नाही; उपलब्ध मनुष्यबळाचे उपयुक्त मनुष्यबळात रूपांतर झाले पाहिजे.

शेतकऱ्यांसाठी कर्जपुरवठ्याचे मार्ग असले तरी परतफेडीच्या वेळी अनेक अडचणी उभ्या राहतात. अतिवृष्टी, दुष्काळ, आजारपण, शिक्षण-लग्नखर्च यामुळे शेतकरी कर्जाच्या चक्रव्यूहात अडकतो. “शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना केवळ नापिकी किंवा कर्जबाजारीपणा कारणीभूत नाही; तर हरवलेला स्वाभिमान आणि समाजातील उपेक्षा हेही मोठे कारण आहे. ग्रामीण वास्तवाचे प्रभावी चित्रण आज अनेक लेखक करत असल्याचे सांगत त्यांनी ग्रामीण तरुण शेतकऱ्यांच्या यशोगाथा साहित्यामध्ये येण्याची गरज आहे. जागतिक हिरोंपेक्षा आपल्या मातीतल्या कर्तृत्ववान शेतकऱ्यांच्या कथा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतील. यावेळी आमदार शेखर निकम म्हणाले, ज्ञान, कष्ट आणि आत्मपरीक्षण यांची सांगड घातल्याशिवाय यश टिकत नाही. साहित्य, लेखन आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम या संमेलनातून घडत आहे. ज्ञान असेल तर आपण चांगले बोलू शकतो; पण अज्ञानाची जाणीव असेल तर शिकण्याची तयारी राहते. तरूणांनी मेहनत घेण्यावर भर द्यावा, शॉर्टकट थारा देऊ नये.

यानिमीत्ताने कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे संजय माने, योगेश खराडे, हरिश्चंद्र देसाई, डॉ. अकुश चोरमुले यांचा गौरव करण्यात आला. या चौघांनी शेतीत घडवलेल्या क्रांतीची यशोगाथा मांडली. तर सकाळ चे माजी संपादक यमाजी पालकर यांनी डॉ. तानाजीराव चोरगे यांची मुलाखत घेत त्यांचा जिवनसंघर्ष उलघडला. जीवनप्रवास उलघडताना चोरगे यांनी विविध विषयावर भाष्य केले. आतापर्यत 49 पुस्तके प्रकाशीत झाली. 50 वे पुस्तक हे मी माझं गाव शोधतोय या विषयावर लिहित असल्याचे त्यांनी सांगितले.

संमेलनाचे प्रमुख कार्यवाह डॉ. निखील चोरगे यांनी संमेलनात सहभागी झालेले साहित्यिक, मान्यवर व ग्रामस्थांबद्ल कृतज्ञता व्यक्त करीत आभार मानले. यावेळी माजी आमदार पाशा पटेल, पद्मश्री पोपटराव पवार, सागर देशपांडे, साहित्यिक प्रकाश देशपांडे, कवी अरूण इंगवले, धीरज वाटेकर, राष्ट्रपाल सावंत, कैसर देसाई, माजी सभापती सुरेश खापले, अंजली चोरगे, बाबूराव धोत्रे पाटील, अजय चव्हाण, संतोष गोणबरे, सुभाष लाड, डॉ. संकेत कदम, महेंद्र गावणंग, ज्ञानोबा बोकडे,सचिन तांबेकर, डॉ. शमिका चोरगे, रोशन मोहिरे, प्रा. प्रशांत इंगवले आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT