रत्नागिरी जिल्हा परिषद pudhari photo
रत्नागिरी

Ratnagiri ZP Election : आ. निकम, सदानंद चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला

चिपळूण तालुक्यात पं. स.साठी खेर्डी, पोफळी, पेढे, शिरगाव, वहाळ गणात रंगतदार लढती

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : तालुक्यातील जि.प.-पं. स. निवडणुकीत शिंदे सेना व भाजपने युती केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला युतीच्या विरोधात लढावे लागणार आहे, तर ठाकरे शिवसेनादेखील रिंगणात असून तालुक्यात बहुसंख्य ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र आहे. आमदार शेखर निकम व शिवसेना उपनेते व माजी आ. सदानंद चव्हाण यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

तालुक्यातील जि. प.चे 9 गट व पं. स.चे 18 गण आहेत. याआधी चिपळूण पं.स.मध्ये राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना यांचे 9-9 सदस्य होते व राष्ट्रवादीचे जि. प. सदस्य अधिक होते. शिवसेना व राष्ट्रवादीच्या विभाजनांनतर प्रथमच जि. प., पं. स.ची ही निवडणूक होत असल्याने यावेळी ग्रामीण भागातील लोकांचा कल स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यावेळी प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवित असून तालुक्याच्या ग्रामीण भागात स्वतःची ताकद या निवडणुकीतून आजमावली जाणार आहे. तालुक्यातील कोकरे, उमरोली, शिरगाव, खेर्डी या जि. प. गटामध्ये अटीतटीच्या लढती असून या ठिकाणी नेत्यांचा कस लागणार आहे, तर पं. स.वर भगवा फडकविणारच, असा दावा शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे चिपळूणची पं. स. ताब्यात मिळविण्यासाठी राष्ट्रवादी विरूद्ध युती असा कडवा संघर्ष पाहायला मिळत आहे.

पंचायत समितीच्या गणामध्ये खेर्डी पं. स. गणासाठी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, ठाकरे शिवसेना वभाजपचे उमेदवार असल्याने खेर्डी गणात भाजप नेते प्रशांत यादव यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. याठिकाणी ठाकरे शिवसेनेकडून उमेश खताते, अजित पवार राष्ट्रवादीकडून माजी पं. स. सदस्य व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ऊर्फ अबू ठसाळे, तर भाजपकडून तालुकाध्यक्ष विनोद भुरण अशा तीन उमेदवारांमध्ये चुरशीची तिरंगी लढत असून या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील हाय व्होल्टेज सामना शिरगाव गणात पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवार व पोफळीच्या माजी सरपंच स्नेहा साळवी यांच्याविरोधात भाजपाने दंड थोपटले आहेत. भाजपाकडून ॲड. नयना पवार या रिंगणात उतरल्या असून या गणात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. ॲड. पवार या निवडणूक लढवित आहेत. त्या स्वप्ना यादव यांच्या भगिनी आहेत. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरत आहे. पेढे गणातदेखील चुरशीची तिरंगी लढत रंगणार आहे. शिवसेना तालुकाप्रमुख संदेश आयरे रिंगणात उतरल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यांच्या विरोधात पेढे येथील राष्ट्रवादीचे मोहन शिंदे हे रिंगणात असून येथे ठाकरे सेनेने निरबाडे येथील महेश महाडिक यांना उमेदवारी दिली आहे.

सावर्डे पं. स. गणामध्ये राष्ट्रवादीचे शौकत माखजनकर यांच्या विरूद्ध शिंदे सेनेचे युवराज राजेशिर्के, तर ठाकरे शिवसेनेकडून सागर सावंत हे निवडणूक लढवित आहेत. येथे शिवसेनेच्या मतांचे विभाजन होण्याचा संभव आहे, तर मांडकी गणामध्ये शिवसेनेकडून अनंत खांबे, ठाकरे शिवसेनेकडून शशिकांत राणीम, तर अजित पवार राष्ट्रवादीकडून माजी उपसभापती शरद शिगवण हे रिंगणात आहेत. त्यामुळे येथे समाजातील मतांच्या विभाजनाचा फटका कोणाला बसणार? यावरच येथील समिकरणे अवलंबून आहेत. उमरोली गणात माजी सभापती जितेंद्र ऊर्फ पप्या चव्हाण शिंदे सेनेकडून रिंगणात आहेत, तर त्यांच्याविरोधात ठाकरे शिवसेनेकडून गौरव पाटेकर, राष्ट्रवादीकडून अरविंद सुर्वे हे रिंगणात आहेत. भोम गणामध्ये शिवसेनेकडून मालदोली येथील माजी सरपंच यांची कन्या पूजा जवरत शिवसेनेकडून रिंगणात आहे, तर राष्ट्रवादीकडून स्वप्नाली माळी, ठाकरे शिवसेनेकडून पूजा शिगवण या रिंगणात आहेत. माजी आ. सदानंद चव्हाण यांच्या होम पिचवर ही तिरंगी लढत होत असूल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. कळवंडे गणात चौरंगी लढत आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या हात या चिन्हावर मुमताज दलवाई या रिंगणात असून विरोधात ठाकरे शिवसेनेच्या निकिता निकम, राष्ट्रवादीच्या नेहा वाजे, तर भाजपच्या सायली वाजे रिंगणात असून त्या मालघर सरपंच सुनील वाजे यांच्या पत्नी आहेत.

दळवटणेे गणात तिरंगी लढत असून या ठिकाणी राष्ट्रवादीच्या मेघा इंगवले, ठाकरे सेनेच्या स्वरा शिंदे, तर शिवसेनेच्या सायली शिंदे रिंगणात आहेत. कापसाळ गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून या ठिकाणी तिरंगी लढत रंगणार आहे. राष्ट्रवादीने कामथे येथील राहूल कांबळे, ठाकरे सेनेने धामणवणे येथील सुभाष जाधव, शिवसेनेने मिरजोळी येथील विनोद हिरे यांना उमेदवारी दिली आहे. अलोरे गणात माजी बांधकाम सभापती विनोद झगडे हे शिवसेनेकडून रिंगणात असून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे कोळकेवाडीचे माजी सरपंच नीलेश कदम, तर ठाकरे शिवसेनेकडून विलास तांदळे रिंगणात आहेत. पिंपळी खुर्द गणात भाजपच्या सुप्रिया देवरूखकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या पूर्वा भोसले निवडणूक लढवित आहेत. वेहेळेमध्ये तिरंगी लढत असून माजी उपसभापती सूर्यकांत खेतले राष्ट्रवादीकडून, तर विरोधात भाजपतर्फे राम राजेशिर्के, अपक्ष म्हणून फैसल सय्यद रिंगणात आहेत.

गुढे गणात तिरंगी लढत असून येथे राष्ट्रवादीच्या सायली बंगाल, भाजपच्या आराध्या रावणंग, तर ठाकरे सेनेच्या सुप्रिया वंजारे रिंगणात आहेत. निवळीमध्ये तिरंगी लढत असून येथे ठाकरे सेनेकडून संजीवनी खापरे, शिवसेनेकडून शर्मिला देसाई, तर राष्ट्रवादीकडून प्रज्ञा सुर्वे रिंगणात आहेत. वहाळ गणात माजी सभापती सुरेश खापले राष्ट्रवादीकडून रिंगणात असून त्यांच्या विरोधात शिवसेनेने संजय जावळे, ठाकरे सेनेने राजेंद्र दळवी, तर बसपाने बुद्धदास सकपाळ यांना रिंगणात उतरविले आहे. कोकरेमध्ये तिरंगी लढत असून शिवसेनेकडून प्राची घडशी, राष्ट्रवादीकडून उज्ज्वला घाग, तर ठाकरे शिवसेनेकडून उज्ज्वला चोगले रिंगणात आहेत. कुटरेमध्ये चौरंगी लढत असून याठिकाणी निशा घडशी ठाकरे शिवसेना, मनस्वी बैकर राष्ट्रवादी काँग्रेस, अक्षता होवले भाजपा, तर अपक्ष म्हणून अर्चना रसाळ रिंगणात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT