चिपळूण शहर : नगराध्यक्ष उमेश सकपाळ हे आमचे नेते आहेत. त्यांच्याकडे बोट दाखवून बदनामी करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करा; अन्यथा शिवसैनिक म्हणून आम्हाला मैदानात उतरावे लागेल. त्यासाठी नगरसेवकपद गेले तरी हरकत नाही, असा इशारा देत निहार कोवळे यांच्यासह शिवसैनिकांनी बुधवारी मुख्याधिकारी संजय जाधव यांना दिला.
चार दिवसांपूर्वी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या दालनात शहरातील एका दिव्यांग खोकेधारकासंदर्भात न. प. मालमत्ता विभागातील अधिकारी सागर शेडगे व नगराध्यक्ष सकपाळ यांच्यात जोरदार वादंग झाले. त्यानंतर शेडगे यांनी सायंकाळी उशिराने उमेश सकपाळ यांनी त्यांच्या दालनात आपल्याला धमकी दिल्याची तक्रार राज्य संवर्ग कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच चिपळूण शहर व नगर परिषद वर्तुळात खळबळ उडाली. परिणामी शेडगे यांच्या तक्रारीचे पडसाद बुधवारी चिपळूण न.प.त उमटले. कथित धमकी प्रकरण तक्रारीवरून शिवसैनिक आक्रमक झाले. बुधवारी सकाळी ११ वाजता सत्ताधारी शिवसेना गटातील नगरसेवक निहार कोवळे, अंकुश आवले, कपिल शिर्के, उदय जुवळे, विकी लवेकर, माजी नगरसेवक परिमल भोसले, नगरसेविका राणी महाडिक, वृषाली पवार, माजी नगरसेविका रश्मी गोखले आदी महिला पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या दालनात जोरदार हंगामा केला.
यावेळी मुख्याधिकारी जाधव म्हणाले, संबंधित कर्मचारी हा संवर्गातील असून त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे आम्हाला अधिकार नाहीत. त्यांच्याबाबत असलेल्या तक्रारी, कागदपत्रांची माहिती व पडताळणी घेऊन त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला जाईल. वरिष्ठ अधिकारी त्या अहवालाची पडताळणी करून अधिकाऱ्यावर कारवाई करण्याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवून कारवाईबाबत शिफारस करू शकतात, असे स्पष्टीकरण दिले.
तसेच नगराध्यक्षांच्या दालनात झालेल्या या वादासंदर्भात त्या अधिकाऱ्याने आपल्याला माहिती देताना, असे किरकोळ वाद होत असतात, काही वाद गैरसमजातून होतात, वाद गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नसल्याने तसेच गैरसमजातून झालेला वाद दोघांकडून मिटविण्याचे तसेच कर्मचारी व संघटनेने हस्तक्षेप केला नाही असे सांगितल्याचे मुख्याधिकारी जाधव यांनी यावेळी सांगितले. मात्र, सायंकाळी उशिराने त्या अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली, असे त्यांनी शिवसैनिकांना सांगितले.
यावर शिवसैनिकांनी, संबंधित कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करून त्याची रजा रद्द करा, त्याला तातडीने कामावर हजर होण्याचे आदेश द्या, आता आम्ही माघार घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या कर्मचाऱ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारींचे निराकरण करणे हे नगराध्यक्षांचे काम आहे. असे असताना त्या अधिकाऱ्याने नगराध्यक्षांकडे बोट दाखवित मुजोरगिरी केली आहे, अशा संतप्त भावना व्यक्त करीत संबंधितावर कारवाई न झाल्यास आम्ही शिवसैनिक म्हणून उतरणार आहोत, असा इशारा दिला.