भाजी मंडई, मटण-मच्छी मार्केट प्रश्न सुटणार! 
रत्नागिरी

Umesh Sakpal : भाजी मंडई, मटण-मच्छी मार्केट प्रश्न सुटणार!

चिपळुणातील व्यापाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे बदल करणार : नगराध्यक्ष सकपाळ

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : शहरातील 20 वर्षे बंद अवस्थेत असलेल्या मटण-मासे मार्केट आणि भाजी मंडईच्या इमारतीमध्ये व्यापाऱ्यांच्या सूचनेनुसार आवश्यक ते बदल करण्यात येतील आणि या दोन्ही इमारती व्यापाऱ्यांच्या सूचनेनुसार वापरात येतील. याचे नियोजन करू, त्याचे अंदाजपत्रक तातडीने तयार करून आवश्यक ते बदल करून भाजी मंडई व मटण-मासे मार्केट सुरू केले जाईल, असा शब्द नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्यापाऱ्यांच्या बैठकीत दिला. यावेळी त्यांनी दोन्ही मार्केटची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

नगराध्यक्ष सकपाळ शहरात व्यापारी, नागरिक, अधिकारी यांच्या बैठका घेत विकासकामांचा आढावा घेत आहेत. दोन्ही बैठका इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात झाल्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी शहरातील मटण-मासे मार्केट इमारतीची पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांना, मासे उतरविण्यासाठी आवश्यक जागा, शेळ्या-मेंढ्या उतरविण्यासाठी जागा, पार्किंग व्यवस्था आदी सूचना मांडल्या. यावर आपल्या सूचनेनुसार बदल केले जातील व यानंतर व्यापाऱ्यांनी येथे मार्केट सुरू करावे अशी विनंती केली. सर्व व्यापाऱ्यांनी दुजोरा देत एकाच ठिकाणी मटण-मासे विक्री करण्याचे आश्वासन दिले. यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न निकाली निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

याशिवाय सकपाळ यांनी विनावापर पडून असलेली भाजी मंडई इमारतीची पाहणी करून व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी भाजी उतरण्यासाठी जागा, जुना स्टॅण्डकडे जाणाऱ्या मार्गावर मंडईचे प्रवेशद्वार अशा सूचना केल्या. यावर बदल केले जातील व संबंधित अधिकाऱ्यांना अंदाजपत्रक़ तयार करण्याच्या सूचना केल्या. शहर हे आपले घर आहे असे समजून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी नगरसेवक निहार कोवळे, उदय जुवळे, सुयोग चव्हाण, बांधकाम अभियंता डफळे, उपमुख्याधिकारी मंगेश पेढांबकर, प्रमोद ठसाळे, वैभव निवाते, बिलाल पालकर, भाजी व्यापाऱ्यांच्या बैठकीला भरत गांगण, दत्तात्रय वाळुंज, श्री. माजलेकर, बापू शिंदे, स्वाती खेडेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी पाटण येथील भाजी मंडईची पाहणी करू आणि त्यानंतर आपल्या शहरातील भाजी मंडईअसे आश्वासन भाजी व्यापाऱ्यांना दिले.

नालेसफाईच्या सूचना

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शहरातील महामार्गालगतच्या पॉवर हाऊस येथील नाल्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरातील सर्वच नाल्यांची साफसफाई करण्यात यावी, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT