चिपळूण शहर : चिपळूण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व विषय समिती सभापतींचा समावेश असलेल्या स्थायी समितीची बैठक नुकतीच झाली. यावेळी स्थायी समितीमध्ये न.प.चा 2026 सालचा अर्थसंकल्प तत्वतः मंजूर करण्यात आला. तसेच सध्या न.प.च्या शेंगदाणा बिल्डिंगमध्ये सुरू असलेले कामकाज अन्यत्र नेण्याबाबतही चर्चा झाली. स्थायी समितीमधील मंजूर बजेटमध्ये कोणतीही करवाढ सुचविण्यात आली नाही. तब्बल चार वर्षानंतर चिपळूण न.प.चे आर्थिक अंदाजपत्रक निवडून आलेल्या सदस्यांच्या माध्यमातून लवकरच सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मंजुरीसाठी येणार आहे.
बुधवारी सायंकाळी चिपळूण न.प.च्या स्थायी समितीची बैठक डीबीजे महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये घेण्यात आली. यावेळी मागील चार वर्षांच्या आर्थिक अंदाजपत्रकावर काही काळ चर्चा झाली. त्यानंतर पुढील अंदाजपत्रकामध्ये प्रशासनाकडून काही उपाययोजना सूचविण्यात आल्या. त्यानुसार प्रत्यक्षात कुठलीही करवाढ न करता पाणी विभागाकरिता नागरिकांकडून विविध विषयांचे अर्ज दाखल केले जातात. त्यामध्ये नळ जोडणी बंद करणे, दुरुस्ती करणे, जागा बदलणे, नाव दुरूस्त करणे आदी विषयांकरिता शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच घरपट्टी करासंदर्भात कोणीतीही वाढ करण्यात आली नसून जुन्या दरानेच कर आकारणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, सध्या ज्या इमारतीत न.प. प्रशासकीय कामकाज सुरू आहे ती मुख्य जुनी इमारत धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार या इमारतीमधील कामकाज थांबवून अन्यत्र कामकाज सुरू करावे, अशा सूचनेनुसार लवकरच आता पावसाळ्यापूर्वी इमारतीमधील कामकाज थांबवून शहरातील अन्यत्र इमारतीमध्ये न.प.चे कामकाज नेण्याबाबत सर्वानुमते निर्णय झाला. त्यादृष्टीने शहरातील नागरिकांना मध्यवर्ती ठिक़ाण व न.प.चे संपूर्ण कामकाज एकाच छताखाली चालेल, अशी इमारत शोधण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.