Ratnagiri : चिपळुणात महामार्गालगत टपर्‍यांचे पेव 
रत्नागिरी

Ratnagiri : चिपळुणात महामार्गालगत टपर्‍यांचे पेव

आशीर्वाद कोणाचा; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष, काहींनी जागा अडकून ठेवली

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगत अतिक्रमणे वाढली आहेत. अनेक ठिकाणी महामार्गाच्या दुतर्फा बांधलेल्या गटारावर टपर्‍या उभ्या करण्यात आल्या आहेत. याकडे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने पूर्णतः डोळेझाक केली असून, नगर परिषदेचे देखील अशा अनधिकृत व्यावसायिकांना अभय आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

चिपळूण शहरात चौपदरीकरण अंतर्गत बहादूरशेख चौक ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला काँक्रिटचा सर्व्हीस रोड बांधण्यात आला आहे. या रोडलगतच्या गटारावर दिवसेंदिवस अनेक टपर्‍या उभ्या राहात आहेत. यातील काही टपर्‍या तर कायमच बंद स्थितीत दिसत आहेत; मात्र काही लोकांनी अनधिकृतपणे या जागा अडकविण्यासाठी त्या ठिकाणी टपर्‍यांची उभारणी केली आहे. शहरातील बहादूरशेख चौक ते कापसाळ विश्रामगृह दरम्यान सर्व्हीस रोडलगतच्या गटारांवर अशा टपर्‍या वाढल्या आहेत. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. मध्यंतरी या संदर्भात तक्रार झाल्यानंतर महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येणार होती; मात्र त्यानंतर शहरातील काही ठिक़ाणी महामार्गालगतची अतिक्रमणे काढण्यात आली. तरीही गटारावर ठिकठिक़ाणी अंतरा-अंतराने अनेक टपर्‍या उभ्या राहाताना दिसत आहेत. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. या अनधिकृत टपर्‍या उभारण्यास जबाबदार कोण? किंवा कोणाच्या आदेशाने व सहकार्याने या टपर्‍या उभ्या राहात आहेत याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. काही ठिकाणी या टपर्‍यांवर बंदी असलेला गुटखा तसेच जुगार मटका देखील चालविला जात आहे तर काही टपर्‍या गांजा, चरससाठी वापरल्या जात असल्याचा संशय काही नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनीही या टपर्‍यांची गंभीर दखल घेणे जरूरीचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT