चिपळूण शहर : शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करणार्या चिपळूण नगर परिषदेची मुख्य शेंगदाणा इमारत पाडण्याची घाई करू नका, असे आवाहन अजित पवार राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष मिलिंद कापडी यांनी चिपळूण न.प. प्रशासन व नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची भेट घेऊन केले आहे. ही इमारत न. प. स्थापनेचा शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवाचा कालावधी होईपर्यंत उभी राहावी; जेणेकरून महोत्सवादरम्यान ही इमारत ऐतिहासिक साक्षीदार म्हणून न. प.च्या गॅझेटमध्ये नोेंदवली जाईल, असेही कापडी यांनी स्पष्ट केले.
कापडी पुढे म्हणाले, चिपळूण न.प.ची स्थापना सुमारे दीडशे वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्यात झाली. यावेळी स्थापन झालेल्या न.प.चा कारभार हा बापट आळी येथील एका खासगी इमारतीत काही काळ सुरू होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहराचा विस्तार आणि कामकाजात वाढ झाल्यावर इमारतीची जागा अपुरी पडू लागली. दरम्यान, न.प.चा कारभार चालविण्यासाठी प्रशस्त अशी इमारत उभी करण्याचा तत्कालीन स्थानिक बोर्डाचा निर्णय प्रशासनाकडून झाला. त्यानंतर सध्या उभी मजबूत दगडी बांधकामाची दुमजली इमारतीचे काम सुरू झाले. ही इमारत त्यावेळी केवळ ८० हजारात उभारण्यात आली.
चिपळूण हे शिवकालापासून प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखले जात होते. प. महाराष्ट्रातून सह्याद्रीच्या कुंभार्ली घाटातून व्यापारी साहित्य साहित्य बैलगाडीतून चिपळुणात येत असे. मुंबई व कोकणातून जल वाहतुकीमार्गे आलेले साहित्य चिपळूण बंदरावर अर्थात नाईक बंदर व गोवळकोट बंदर येथे उतरविले जायचे. त्याठिक़ाणी या दोन्ही ठिकाणच्या मालाची देवाण-घेवाण झाल्यावर न.प. कर वसूल करीत असे. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातून शेंगदाण्याचा व्यापार चालत असे. शेंगदाण्याच्या व्यापार करातून मिळालेल्या उत्पन्नातून ही इमारत केवळ ८० हजारांत उभारली.
आजही ही इमारत भक्कम असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. काही किरकोळ डागडुजी व दुरूस्ती केल्यास ही इमारत पुढील २५ ते ३० वर्षे सुस्थितीत राहू शकते. मात्र शहराचा वाढता विस्तार, वाढते प्रशासकीय कामकाजाचा विचार करता न. प.ने नव्याने अत्याधुनिक इमारत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून शासनाकडून ११ कोटींचा निधी मिळाल्याचे सांगितले जाते, तर २५ वर्षांपूर्वी उभारलेली जोड इमारत निष्कसीत करून नव्याने इमारत बांधली जाणार आहे. मात्र सध्याची इमारत म्हणजेच शेंगदाणा बिल्डिंग पाडावी लागणार असल्याचे म्हणणे आहे. मात्र ही इमारत पाडण्याची घाई न. प.ने करू नये. पुढील दोन महिन्यांतच अर्थात डिसेंबरमध्ये चिपळूण न.प. शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करणार आहे. या कालावधीपर्यंत तरी ही शेंगदाणा इमारत उभी राहावी; जेणेकरून न.प.च्या शतकोत्तरी सुवर्णमहोत्सव उपक्रमाची शेंगदाणा बिल्डिंग साक्षीदार होईल व त्याची न.प.च्या कागदपत्रावर नोंद राहील. याचा विचार करून ही इमारत तोडण्याची घाई करू नका, असे कापडी यांनी सांगितले आहे.