मतदान यंत्र pudhari photo
रत्नागिरी

Ratnagiri ZP Election : चिपळुणात 50 ठिकाणी मतदान यंत्रांत बिघाड

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक मतदारांसह उमेदवारांमध्ये संतप्त भावना

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : चिपळूण तालुक्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 50.47 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया संपेपर्यंत चिपळूण तालुक्यातील 245 मतदान केंद्रांवर सुमारे 65 ते 70 टक्के मतदान होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, तालुक्यातील ग्रामीण भागातील ठिकठिक़ाणी असणाऱ्या मतदान केंद्रातील मतदान यंत्रात सातत्याने बिघाड झाल्याने मतदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली. विशेषकरून एकदा दुरुस्त झालेले मतदान यंत्र तीन ते चारवेळा पुन्हा थोड्या-थोड्या वेळाने बंद होत असल्याने अनेक ठिक़ाणी मतदानाला व्यत्यय आला तर कळवंडे येथे दुपारी 12 तर कुडप या ठिकाणी दुपारी 2 नंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली. अनेक ठिकाणी मतदार यंत्र बंद असल्याने केंद्रातून बाहेर पडले. मतदान प्रक्रियेसंदर्भात मतदारांमध्ये यावेळी तीव्र नाराजी पाहायला मिळाली. अनेकांनी संतापदेखील व्यक्त केला.

चिपळूण तालुक्यात जि.प.चे 9 आणि पं. स.चे 18 गण आहेत. या ठिकाणी ठाकरे शिवसेना, शिवसेना- भाजपा युती आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष अशी तिरंगी लढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चुरशीचे सामने आहेत. मात्र, सकाळच्या पहिल्या टप्प्यातच ठिकठिकाणी मतदान यंत्रात बिघाड होत असल्याचे निवडणूक यंत्रणेच्या लक्षात आले. अनेक ठिकाणी नवे मतदान यंत्र आणेपर्यंत दुपार झाली. काही ठिकाणी तर उमेदवार आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडले. मतदार मतदान करण्यासाठी मतदान कक्षावर रांगा लावून उभे असतानाच यंत्रामध्ये बिघाड झाल्याने अनेकजण मतदान न करता माघारी फिरले. यानंतर निवडणूक यंत्रणेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

तालुक्यातील कापसाळ, खेर्डी, सावर्डे या ठिकाणी वादावादीचे प्रकार झाले. सकाळी 7.30 वा. मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळी 7.30 ते 9.30 या कालावधीत 11 टक्के मतदान झाले. 9.30 ते 10.30 वा. पर्यंत 25.14 टक्के, दुपारी 1.30 वाजेपर्यंत 38.40 टक्के, साडेतीन वाजेपर्यंत 50.47 टक्के मतदान झाले. आ. शेखर निकम यांनी सावर्डे येथे, आ. भास्कर जाधव तुरंबव या ठिकाणी तर भाजपा नेते प्रशांत यादव यांनी खेर्डी येथे मतदानाचा हक्क बजावला. ठिकठिकाणी मतदान यंत्र बंद होत असल्याने अनेक लोकांनी तहसीलदार, प्रांताधिकारी यांना दूरध्वनी केले. स्थानिक आमदार शेखर निकम यांनादेखील कल्पना दिली. ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेला मोठा फटका बसला. यामुळे मतदारांसह उमेदवारांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. खेर्डी जि.प. गटातील चार ते पाच मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन बंद पडले. त्यामुळे मतदारांना प्रतीक्षा करावी लागली. संतप्त मतदारांनी नाराजी व्यक्त केली.

शिरगाव या ठिकाणी सकाळच्या सत्रात तब्बल एक तास दोन मशिन बंद अवस्थेत होत्या. सावर्डे कॉलनी, पिंपळ मोहल्ला, गुडेकरवाडी, मांडकी, कुडप, खरवते, कौंढरताम्हाने, कापरे, कापसाळ, कळंबस्ते, पेढांबे, पिंपळी, सती-चिंचघरी, कुडप, मालघर, कोंढे, शिरगाव आदी गावांमध्ये मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. त्यामुळे मतदान यंत्रणेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सकाळच्या वेळी मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली. मात्र, अनेक ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याने तासन्‌‍तास रांगा लागल्या. कुडप, कापसाळ आणि कळवंडे, पेढांबे या ठिकाणी उशिराने मतदान प्रक्रिया सुरू झाली. या संदर्भात्र प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी, ज्याठिकाणी ईव्हीएम यंत्रात बिघाड झाला आहे. त्या ठिकाणी जादा मशिन पाठविण्यात आल्याची माहिती दिली. त्यासाठी 50 ईव्हीएम मशिन उपलब्ध करण्यात आल्या. तसेच असाच प्रकार पुन्हा घडू नये म्हणून त्या ठिकाणी जादा मशिन तैनात करण्यात आल्या. ज्या-ज्या ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड झाले आहेत त्या ठिकाणी सायंकाळी 5.0 पर्यंत मतदान केंद्रात हजर राहणाऱ्या मतदारांना मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदान करता येईल असे निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी सांगितले. मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. साडेतीन वाजेपर्यंत 50 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत 65 ते 70 टक्के मतदान होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

निवडणूक यंत्रणेचा सावळागोंधळ ः आ. शेखर निकम

चिपळूण तालुक्याचा विचार केला तर जि. प., पं. स. निवडणुकीसाठी लावण्यात आलेल्या 50 मतदान केंद्रांतील ईव्हीएम मतदान यंत्रात बिघाड झाला आहे. ते बंद आहेत अशा तक्रारी येत आहेत. एकदा मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर दोन-चार वेळा मशिन आणल्या तरी बिघाड होत आहे. त्यामुळे मतदारांमध्ये शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी कोणत्याही निवडणुकीमध्ये असा प्रकार घडला नव्हता. एवढ्या मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मशिन बंद पडण्याच्या घटना समोर येत आहेत. सावर्डे कॉलनीचे उदाहरण घेतल्यास सुमारे 50 लोक मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदान न करताच त्यांचे परतीचे आरक्षण असल्याने मतदानापासून वंचित राहिले आहेत. या अनागोंदी कारभारामुळे त्या लोकांना मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही. त्यामुळे या बाबत अनेक लोकांनी आक्षेप घेतलेला आहे. आगवेसारख्या ठिकाणी अडीच तास बंद आहे. मशिन हँग होत आहे. हा सगळा सावळागोंधळ झाला आहे, असे आ. शेखर निकम यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT