चिपळूण शहर : चिपळूणच्या राजकीय पटावर स्वतःच्या अस्तित्वासाठी अनेक वर्षे झगडणार्या भाजपला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर चिपळुणातील भाजपमध्ये मात्र ‘ना’ राजीनामा नाट्याला सुरुवात झाली आहे. या नाटकाची सूत्रे पडद्यामागून हलविली जात असल्याची चर्चा भाजप वर्तुळातच सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातील काहींनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे तर काही लोकप्रतिनिधींना आता थेट त्यांच्या लोकप्रतिनिधीत्वाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले गेल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.
चिपळुणातील भारतीय जनता पक्ष यापूर्वी अनेक निवडणुकांतून राजकीय पटावर आपल्या अस्तित्वासाठी झगडत होता. मात्र, मागील झालेल्या निवडणुकांदरम्यान भाजपने प्रथमच स्वतःच्या ताकदीचे अस्तित्त्व निर्माण केले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणने भाजपच्या अस्तित्त्वाची ताकद दाखवून देण्यास सुरुवात केली. सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. या इनकमिंगच्या परिणामी चिपळूण भाजपमध्ये मात्र जुने-नवे असा नाट्यपूर्ण वाद रंगू लागला आहे. नव्यांना पदे, जुन्यांच्या हाती झेंडे अशा भावना व्यक्त होत आहेत. पक्षात इनकमिंग जोरदार असल्याने सध्या भाजपचे सभागृह हाऊसफुल्लकडे वाटचाल करीत आहे. दुसरीकडे जुन्यांना स्वतःच्या अस्तित्वा साठी धडपडावे लागत आहे. त्यातूनच नवा-जुना राजकीय वादाचे नाटक सुरू झाले आहे. या नाट्यात जुन्यांची नव्यांवर राजकीय कुरघोडी व तक्रारी सुरू झाल्याने ’शत् प्रतिशत् भाजप’च्या घोषवाक्याला नाराजीची व राजीनाम्याची किनार लागली आहे. यातूनच एकमेकांविरूद्ध छुप्या पद्धतीने तक्रार करण्याचे डाव खेळले जात आहेेत. तर काही असंतुष्ट पडद्यामागून सूत्रे हलवित असल्याचे सांगितले जात आहे. या नाट्याला सुरुवात झाल्या-झाल्या पडद्यामागून सूत्रे हलविणार्यांनी चिपळुणातील एका लोकप्रतिनिधीपदाचा थेट राजीनामाच घेण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून काढले आहेत. अवघ्या उण्यापुर्या ५ते ६ महिन्यांचा कालावधीत सेवक म्हणून कामकाज करणार्याला ‘त्या’ पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले गेल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे जुन्या-नव्या वादात काही जुन्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत,असे वृत्त आहे.
पडद्यामागून सूत्रे हलविणार्यांनी राजीनामा देणार्यांचे समर्थन करताना एक व्यक्ती, एक पद, एक कुटुंब एक पद असे पक्षाचे राबविले जात नाही तर एकाच घरात दोन-तीन पदे देऊन पक्ष बळकट होणार का? या कारणास्तव पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जाते, मात्र या संदर्भात पदाचा राजीनामा देण्यासोबत वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. बैठकीत संबंधित जुन्या कार्यकर्त्यांनी पदांचे राजीनामे मागे घेतले. गेले काही दिवस चर्चेत असलेल्या १ ते २ लोकप्रतिनिधींना त्यांच्या सेवकपदाचा राजीनामा देण्यास वरिष्ठ पातळीवरून आदेश देण्यात आल्याने पक्षांतर्गत वर्तुळात खळबळ उडाली आहे.