खेड रेल्वे स्टेशन समोरील डोंगरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  Pudhari Photo
रत्नागिरी

'मृत व्यक्तीने स्वप्नात येऊन मागितली मदत'; तरुणाच्या दाव्याने खेड पोलिसांची तारांबळ

Ratnagiri Crime News | पुरुष जातीचा सांगाडा सापडल्याने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

खेड, पुढारी वृत्तसेवा: साहेब मला स्वप्नात येऊन एक व्यक्ती खेड रेल्वे स्टेशन समोरील डोंगरातून मदत मागत आहे, असे सांगत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील एका तरुणाने खेड पोलिसांचे लक्ष वेधले. परंतु त्या व्यक्तीने पोलिसांना स्वप्नात दिसत असलेल्या डोंगरात नेले असता बुधवारी (दि.१८) तेथे चक्क एका पुरुषाचा सांगाडा सापडल्याने पोलिसांची तारांबळ उडाली आहे. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून आता तपासाची चक्र वेगाने फिरू लागली आहेत. (Ratnagiri Crime News)

तरुणाच्या दाव्यात सकृतदर्शनी तथ्य

खेड पोलीस ठाण्यात दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी योगेश पिंपळ आर्या (वय ३०, रा. आजगाव, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) हा आला. त्याने पोलिसांना सांगितले की, 'मला वारंवार स्वप्न पडतात. खेड रेल्वे स्टेशन समोर एका डोंगरातून एक पुरुष माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा, असे सांगतो. त्यावेळी मला एक मृतदेह देखील दिसतो, असे त्याने सांगितले. योगेश आर्याच्या बोलणे सुरवातीला जरी पोलिसांना अविश्वसनीय वाटत होते. तरी मृतदेह दिसत असल्याचे त्यांनी संगितल्याने पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली. आर्या याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी कर्मचाऱ्यांसह या भागाची पाहणी केली. त्यावेळी खेड रेल्वे स्टेशन समोर असलेल्या भोस्ते घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्याचा वास येत असल्याचे त्यांच्या जाणवले. (Ratnagiri Crime News)

मृत व्यक्तीची ओळख पटवणारे कुठलेच पुरावे सापडले नाहीत

पोलिसांनी जवळ पाहिले असता आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर व प्लास्टिकच्या पट्टया बांधून त्याला टॉवेलने बांधून एक फास लटकलेला त्यांना दिसला. त्या जवळच एका अनोळखी व्यक्तीचा शीर नसलेला सांगाडा खाली पडलेले दिसला. त्याच्या अंगात राखाडी रंगाचे जॅकेट, राखाडी रंगाची पँट असा पोषाख होता. या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची सॅक सापडली. सांगाड्या पासून ५ फुटावर एक कवटी सापडली. तर काळ्या रंगाचे बूट सापडले. मात्र, या व्यतिरिक्त जवळच्या सॅकमधे पोलिसांना मृत व्यक्तीची ओळख पटवणारे कुठलेच पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मृतदेह पूर्ण पणे कुजून केवळ सापळा शिल्लक राहिलेला दिसत असल्याने त्याचा मृत्यू खूप दिवसांपूर्वी झालेला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यू नोंद करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. (Ratnagiri Crime News)

खूनाचे गूढ खेड पोलीस उलगडू शकतील का?

सावंतवाडीतील युवकाला स्वप्नात एक व्यक्ती येऊन सांगते आणि त्यानंतर खेडमध्ये मृतदेह आढळतो, ही गोष्ट विस्मयकारी आणि अचंबित करणारी आहे. मात्र, त्यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्गात खळबळ उडाली असून तो मृत व्यक्ती कोण? सावंतवाडीमधील योगेश या तरुणालाच स्वप्नात जाऊन त्याने का सांगितले ? त्याने आत्महत्या केली की त्याचा खून झाला ? असे अनेक प्रश्न या घटने नंतर चर्चिले जाऊ लागले आहेत. हे गूढ खेड पोलीस उलगडू शकतील का? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT