Ratnagiri Zilla Parishad
रत्नागिरी : शासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता, तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या नावाचा गैरवापर करुन मिशन आपुलकी योजने अंतर्गत शाळेच्या मदतीसाठी लकी ड्रॉ कूपन छापणार्या पदविधर शिक्षकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण राबसाहेब किणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित शिक्षकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरीचे शिक्षणाधिकारी भिकाजी मारुती कासार (वय 54, सध्या रा. सावली बंगलो, नाचणे, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी हा 5 डिसेंबर 2022 ते 24 ऑक्टोबर 2024 या कालावधीत कशेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.1 येथे पदवीधर शिक्षक म्हणून नेमणुकीस होता. या कालावधीत त्याने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कशेळी नंबर 1 या नावाने लकी ड्रॉ कुपन छापले. त्या कुपनवर गुणवत्ता पूर्ण शाळा शैक्षणिक कमिटी व शाळा व्यवस्थापन कमिटी यांच्या सहयोगाने मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या प्रेरणेने मिशन आपुलकी योजने अंतर्गत शाळेच्या मदतीसाठी लकी ड्रॉ कूपन तयार केले. त्यावर पहिले बक्षीस एल.ई.डी. टीव्ही, दुसरे बक्षीस घडयाळ, तिसरे बक्षीस टी शर्ट, चौथे बक्षीस किचन, बंपर बक्षीस फ्रिज असा मजकूर लिहिला.
सदर कुपन हे आरोपी याने शासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता, तसेच जिल्हा परिषद रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या नावाचा गैरवापर करुन, त्यांच्या लौकिकास तसेच जिल्हा परिषद रत्नागिरीचे लौकिकास बाधा आणून शासनाची फसवणूक करण्याचे उद्देशाने बनावटीकरण करून छापले होते. याप्रकरणी संशयित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.