रत्नागिरी : शहरानजीकच्या उद्यमनगर परिसरातील बंगला फोडून अज्ञाताने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ५४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घरफोडीची ही घटना मंगळवारी रात्री ९ ते बुधवारी सकाळी ९ या कालावधीत घडली आहे.
याबाबत संतोष मधुकर बाष्टे (६०, रा. घरकूल हौसिंग सोसायटी तीर्थरूप बंगला, उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे लॉक उचकटून आतील १ लाख २५ हजारांचे २५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, २० हजारांची ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ५ हजार रुपयांचा चांदीचा कुंकवाचा करंडा व रोख ४ हजार ४०० रुपये असा एकूण १ लाख ५४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला.
घरफोडीची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चोरीचा पंचनामा केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचा कार्यवाही सुरू केली असून संशयित चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.