theft Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri Theft : बुरंबीत इको चोरी करून शाहूवाडी तालुक्यात ३ सराफी दुकाने फोडली

संगमेश्वर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत गाडीचा लावला छडा

पुढारी वृत्तसेवा

देवरुख :संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी येथून दोन दिवसांपूर्वी चोरीला गेलेली इको कार आणि त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथे चोरट्यांनी तीन सराफी दुकाने मंगळवारी मध्यरात्री फोडून १ लाख १0 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. संगमेश्वर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत गाडीसह चोरीचा छडा लावण्यात यश मिळवले असले तरी गुन्हेगारांची टोळी अद्याप फरार असून पोलिसांना चकवा देत आहे.

बुरंबी येथील मारुती नागेश सुतार यांची ‘मारुती सुझुकी इको’ (MH-08-Z-4703) ही गाडी घराबाहेर उभी असताना अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास अत्यंत कौशल्याने लंपास केली. चोरीची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरट्यांनी महामार्गावरून अत्यंत वेगाने आणि नियोजनबद्ध हालचाली करत पळ काढल्याचे दिसून आले. तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली. चोरट्यांनी ही गाडी केवळ चोरीसाठी नव्हे, तर मोठ्या गुन्ह्यासाठी वापरण्याचा कट रचला होता. त्यांनी चिपळूण मार्गे कराड ओलांडत कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केला आणि शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथे ३ सोन्याची दुकाने याच गाडीच्या सहाय्याने फोडली. चोरीनंतर पोलिसांचा पाठलाग चुकवण्यासाठी चोरट्यांनी मुख्य रस्ते टाळून अंतर्गत मार्गांचा वापर केला. नंतर केर्ले गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला गाडी बेवारस सोडून ते पसार झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT